Vaishnavi Hagawane Case another accused Nilesh Chavan found taken into custody by Pimpri Chinchwad police from Nepal
Marathi May 31, 2025 11:25 AM


वैष्णवी हगवणे प्रकरणात तिच्या सासरच्यांसोबतच निलेश चव्हाण याचे नावही समोर आले. पण 21 मे पासून निलेश फरार होता. त्यामुळे त्याच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला होता. पण आता 10 दिवसांनंतर निलेशचा पत्ता पोलिसांना लागला असून त्याला नेपाळ बॉर्डवरून पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पुणे : वैष्णवी हगवणे हिने 16 मे रोजी हुंड्यासाठी सासरच्यांकडून होत असलेल्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. कारण पुरोगामी म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात आजही अशा घटना घडत असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. वैष्णवी हगवणे हिच्यावर तिचा सासरा राजेंद्र हगवणे (अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा माजी पदाधिकारी), सासू लता हगवणे, नवरा शशांक हगवणे, दीर सुशील हगवणे आणि नणंद करिष्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Vaishnavi Hagawane Case another accused Nilesh Chavan found taken into custody by Pimpri Chinchwad police from Nepal)

पण याच प्रकरणात एक नाव प्रकर्षाने समोर आले आहे ते म्हणजे निलेश चव्हाण. निलेश चव्हाण याच्यावर वैष्णवीच्या आई-वडिलांना धमकावल्याचा आणि तिच्या बाळाची हेळसांड केल्याचा आरोप करण्यात आला होता. पण हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर निलेश चव्हाण हा 21 मे पासून फरार होता. पण आता 10 दिवसांनंतर त्याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. नेपाळ बॉर्डरवरून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला आज शुक्रवारी (ता. 30 मे) सायंकाळपर्यंत पुण्यातील बावधन पोलीस ठाण्यात हजर करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा… Rohini Khadse : वैष्णवीचे प्रकरण सीआयडीकडे सोपवा, शंका उपस्थित करत रोहिणी खडसेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

वैष्णवीची नणंद करिष्मा हगवणे हिचा मित्र असलेला निलेश चव्हाण हा कायमच हगवणे कुटुंबाच्या वादात मध्यस्थी करायचा. त्यामुळे वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिचं बाळसुद्धा निलेश चव्हाणकडे देण्यात आले होते. पण ज्यावेळी वैष्णवीच्या माहेरच्यांना म्हणजेच कस्पटे कुटुंबीयांना ते बाळ त्याच्याकडे असल्याची माहिती मिळाली, तेव्हा ते त्याच्या घरी बाळाला आणायला गेले. पण तेव्हा निलेशने कस्पटे कुटुंबाला बंदुकीचा धाक दाखवला आणि त्यांना घरातून बाहेर काढले. त्यानंतर निलेशच्या नावाची पोलिसात तक्रार करण्यात आली. पण हे प्रकरण वाढत असल्याचे पाहून निलेशने हे बाळ दुसऱ्या व्यक्तीकडे दिले आणि तो पसार झाला. 22 मे रोजी कस्पटे कुटुंबाला बाळ मिळाले. पण निलेश चव्हाण 21 मे पासून फरार होता.

आठवडा उलटूनही निलेश चव्हाण पोलिसांना सापडत नसल्याने त्याच्याविरोधात स्टँडिंग वॉरंट जारी करण्यात आला. पण दुसरीकडे पिंपरी चिंचवड पोलिसांचे दुसरे पथक निलेशचा शोध घेत होते. फरार निलेश चव्हाणला वैष्णवी हगवणे प्रकरणात सहआरोपी करण्यात आल्यानंतर पोलिसांनी न्यायालयात अर्ज करून स्टँडिंग वॉरंटची मागणी केली होती, जी न्यायालयाने मंजूर करून त्याच्याविरोधात स्टँडिंग वॉरंट जारी केला. पण आज अखेरीस पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्याला नेपाळ बॉर्डरला लागून असलेल्या एका लॉजमधून अटक केली. फरार निलेश हा गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या राज्यात जाऊन राहात होता, अशी माहिती समोर आली आहे.

निलेशने बाळाला डांबून ठेवले होते…

कस्पटे कुटुंबीयांच्या तक्रारीवरुन निलेश चव्हाण याच्या विरोधात पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कस्पटे कुटुंबीयांना धमकावल्याबद्दल आणि पिस्तुलाच्या साहाय्याने दहशत निर्माण केल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला. 20 मे रोजी वैष्णवीच्या माहेरचे लोक तीच्या नऊ महिन्यांच्या बाळाला घेण्यासाठी कर्वे नगर भागातील निलेश चव्हाणच्या घरी गेले असता निलेश चव्हाणने त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांना तिथून जाण्यास सांगितले होते‌. कस्पटे कुटुंबीयांनी बाळाचा ताबा मागितल्यावर तो देण्यासही त्याने नकार दिला होता. यानंतर वैष्णवीचे काका मनोज कस्पटे यांनी निलेश चव्हाण विरोधात वारजे पोलिसांकडे बाळाला बेकायदेशीर डांबून ठेवल्याची तक्रार दिली होती.



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.