साई संस्थानच्या कर्मचाऱ्याचा प्रताप, दक्षिणा पेटीतून लाखोंची रोकड पळवली, ‘असा’ झाला भांडाफोड
Marathi May 31, 2025 01:25 PM

शिर्डी गुन्हा: शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या (Shirdi Saibaba Sansthan) लेखा विभागात कार्यरत असलेल्या बाळासाहेब गोंदकर या शिपायाने दक्षिणा पेटीतून लाखो रुपयांची रोकड चोरल्याचे उघडकीस आले आहे. अविनाश विनायक कुलकर्णी, लेखाधिकारी, यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात (Shirdi Police Station) याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत साई संस्थानने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल 2025 मध्ये झालेल्या दक्षिणा मोजणीच्या सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीत हा प्रकार समोर आला. लेखा विभागातील शिपाई बाळासाहेब नारायण गोंदकर याने दि. 4, 8 आणि 11 एप्रिल रोजी दक्षिणा मोजणीदरम्यान 500 रुपयांच्या नोटांचे बंडल चतुराईने लपवले आणि नंतर ते चोरून नेले. ही चोरी झालेली रक्कम अंदाजे सव्वा ते दीड लाख रुपये दरम्यान असण्याची शक्यता आहे. 16 एप्रिल रोजी दक्षिणा मोजणी पूर्ण झाल्यावर नोट मोजणी मशिनमध्ये 46 हजार 500 रुपये आणि 25 एप्रिल रोजी 500 रुपयांचा आणखी एक बंडल (45 ते 50 हजार रुपये) आढळून आला.

कर्मचाऱ्यावर बडतर्फीची कारवाई

या दोन्ही घटना संशयास्पद वाटल्याने सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यावेळी गोंदकर नोटा लपवताना स्पष्ट दिसले. त्याने नोटा मांडीखाली, पॅन्टमध्ये आणि मशीनच्या मागे लपवून नंतर घेऊन गेल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे. सीईओ गोरक्ष गाडीलकर यांच्या आदेशानुसार, अविनाश कुलकर्णी यांनी गोंदकर याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. संस्थानने गोंदकर याला अगोदरच प्राथमिक माहितीवर निलंबित केले होते. गुरुवारी या संदर्भातील सविस्तर अहवाल प्राप्त होताच त्याच्यावर गुन्हा दाखल करून बडतर्फीचीही कारवाई सुरू करण्यात आली आहे. शिर्डी पोलीस घटनेचा अधिक तापस करत आहेत.

46 लाखांची रोकड घेऊन फरार झालेला चोरटा जेरबंद

दरम्यान, कोपरगावच्या टाकळी शिवारात स्वस्तात बिनशेती प्लॉट देतो असे म्हणत तब्बल 29 जणांकडून 46 लाख रुपये रक्कम घेऊन प्लॉटचा ताबा दिला आणि प्लॉट नावावर न करता दुसऱ्यालाच विकून फसवणूक करणारा शिवम दास याला कोपरगाव शहर पोलिसांनी गजाआड केले आहे. 27 मार्च 2024 रोजी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात शिवम दास आणि त्याचा सहकारी दीपक करण यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, तेव्हापासून ते फरार होते. शिवम दास याने वर्षभर पोलिसांना गुंगारा दिला. अखेर एका प्रकरणात पुणे पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भूषण हंडोरे व त्यांच्या पथकाने बुधवारी त्याला ताब्यात घेतले आहे.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

आणखी वाचा

Crime News : दररोज रात्री आईला द्यायची झोपेच्या गोळ्या, नंतर रात्रभर प्रियकराशी…; 15 वर्षीय मुलीच्या भयंकर कृत्याने खळबळ

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.