Beed Crime : गोतस्करांकडून महिला पोलिस अधिकाऱ्याच्या गाडीला धडक देण्याचा प्रयत्न; दोघे जेरबंद; एक फरार
esakal June 01, 2025 05:45 AM

बीड - परीविक्षाधिन पोलिस उपाधीक्षकांच्या वाहनाला गोतस्करांकडून धडक देण्याचा प्रयत्न झाल्याची घटना शहरात शनिवारी (ता. ३१) दुपारी घडली. गोतस्करी होत असल्याच्या माहितीवरुन वाहन अडविण्याचा प्रयत्न करताना धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना जेरबंद केले असून एक फरार झाला आहे.

पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली. एका पिकअपमधून गोवंशाची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यावरुन परिविक्षाधिन पोलिस उपाधीक्षक पुजा पवार पथकासह धुळे - सोलापूर रस्त्यावर थांबल्या. वाहन येतात त्यांनी थांबविण्याची सुचना दिल्यानंतर पिकअपमधील गोतस्करांनी त्यांच्या वाहनाला धडक देण्याचा प्रयत्न केला.

या प्रकरणी पोलीस अंमलदार दीपक गजानन लहाने यांच्या फिर्यादीवरुन जाबेर कड्डू पठाण, जीशान अब्दुल सत्तार कुरेशी व उमेर कुरेशी (तीघेही रा. बीड) यांच्याविरोधात शासकीय कर्मचाऱ्यांवर जीवे मारण्याचा प्रयत्न आणि गोतस्करीसह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील जाबेर पठाण आणि जीशान कुरेशी यांना अटक करण्यात आली असून, उमेर कुरेशी सध्या फरार झाला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक पुजारी तपास करत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.