नागपूर - बोगस शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून त्यात कनिष्ठ महाविद्यालय आणि अल्पसंख्याक शाळेतही अशाच प्रकारे नियुक्त्या करण्यात आलेला असल्याने त्याचीही सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी आमदार संदीप जोशी यांनी शिक्षण संचालक महेश पालकर यांनी पत्राद्वारे केली आहे.
बोगस शालार्थ आयडी प्रकरणाची चौकशीसाठी शिक्षण विभागाकडून समिती लावण्यात आलेली आहे. याशिवाय पोलिस विभागाकडून विशेष तपास पथक (एसआयटी) मार्फत चौकशी करण्यात येत आहे. त्यात दोन सेवानिवृत्त, एक प्रभारी आणि एक नियमित उपसंचालकाला अटक करण्यात आली.
यामध्ये २०१२ पासून जवळपास १ हजार ५६ प्राथमिक शिक्षकाचा समावेश असल्याची बाब समोर आली आहे. मात्र, ही नियुक्ती केवळ प्राथमिक विभागातील नसून कनिष्ठ महाविद्यालय आणि अल्पसंख्याक शाळांमध्येही अशाच प्रकारे नियमबाह्य नियुक्ती करण्यात आलेली आहे.
त्यामुळे या प्रकरणांची माहिती घेऊन त्याची जाहिरात कोणत्या वर्तमानपत्रात देण्यात आलेली आहे, हे तपासण्यात यावी, नागपूर, चंद्रपूर, भंडारा यासह इतर जिल्ह्यातील प्रकरणांची तपासणी करण्यात यावी.
सायबर क्राईम आणि शिक्षण विभागाकडून संयुक्तरित्या चौकशी करण्यात यावी असेही पत्रात नमूद केले आहे. तेव्हा यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी आमदार संदीप जोशी यांनी केली आहे.