11th Admission : अकरावीच्या प्रवेशातील संस्थात्मक कोट्यातील नवा बदलाबाबत सरकारची अखेर माघार
esakal June 01, 2025 05:45 AM

पुणे : एकाच संस्थेच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक वर्गाच्या शाळा वेगवेगळ्या ठिकाणी असतील, तर अशा संस्थेमधील इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी ‘संस्थात्मक’ (इन-हाऊस) कोट्यातून दहा टक्के जागा उपलब्ध असतील, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने दिली आहे. अशाप्रकारे शिक्षण विभागाने संस्थात्मक कोट्यात यंदा नव्याने केलेला बदल अखेर मागे घेत विद्यार्थी-पालकांना दिलासा दिला आहे.

राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. दरम्यान, राज्य सरकारने संस्थात्मक (इन-हाऊस) प्रवेश नियमावलीत बदल केला आहे. विद्यार्थी एखाद्या शैक्षणिक संस्थेच्या शाळेतून दहावी उत्तीर्ण झाल्यास, त्याला त्या संबंधित संस्थेच्या कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयात ‘संस्थात्मक’ कोट्यांतर्गत प्रवेश उपलब्ध होता. परंतु, या नव्या बदलानुसार, संबंधित विद्यार्थ्याला शाळेच्या आवारातच असणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेशासाठी ‘संस्थात्मक’ कोटा लागू असेल, असे शालेय शिक्षण विभागाने यंदा जाहीर केले होते.

नियमावलीतील या बदलामुळे विद्यार्थी-पालकांमध्ये तीव्र नाराजी असून याबाबतचे वृत्त ‘सकाळ’ने २३ मे रोजी ‘इन-हाऊस कोट्यांतर्गत नियमात बदल’ या शीर्षकाने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत आता पुण्यातील आमदारांनी आणि विविध संघटनांनी अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील संस्थात्मक कोट्याच्या नियमात केलेल्या बदलांचा पुनर्विचार करण्याची मागणी निवेदनाद्वारे राज्य सरकार, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांच्याकडे केली आहे.

राज्य सरकारने अखेर ‘सकाळ’च्या बातमीची दखल घेत या निर्णयात बदल केला आहे. नव्या निर्णयानुसार आता इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील संस्थात्मक कोट्यांतर्गत नियम यापूर्वीप्रमाणेच असणार आहे. एकाच संस्थेच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गाच्या शाळा वेगवेगळ्या ठिकाणी असतील तर अशा संस्थामधील इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रक्रियेमधील प्रवेशासाठी इन-हाऊस कोटा १० टक्के असेल, असे डॉ. पालकर यांनी सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.