पिंपरी, ता. १ : दहा रुपयांच्या कोर्ट फी स्टॅंपसाठी सकाही दहा वाजल्यापासून सव्वाबारापर्यंत खिडकी उघडण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. याबाबतचा अनुभव नेहरूनगर पिंपरी येथील न्यायालयाच्या नवीन इमारतीमध्ये नागरिकांना येत आहेत.
कोर्टामध्ये कायदेशीर अर्ज, याचिका किंवा अपील दाखल करताना कोर्ट फी स्टॅम्प भरणे आवश्यक असते. या स्टॅंप विक्रीसाठी नेहरूनगर येथील न्यायालयात एका खिडकीची सोय करण्यात आली आहे. ही खिडकी दहाऐवजी दुपारी बारा ते सव्वाबारा वाजता उघडत असल्याने नागरिकांन प्रतीक्षा करावी लागत आहे. यामुळे वेळही वाया जात आहे. शिवाय, दोन तास रांगेत थांबावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी वेळेत स्टॅंप विक्री करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
सोबतच कोर्ट फी स्टॅंप कोठे मिळेल, या बाबत सूचना फलक नाहीत. खिडकी उघडण्याची आणि बंद करण्याची वेळ निश्चित दर्शविली नाही, असे नागरिक सांगत आहेत.
माहिती अधिकार अर्जासाठी दहा रुपयांचा कोर्ट फी स्टॅंप लावला जातो. यासाठी सकाळी दहा वाजल्यापासून सव्वाबारा वाजेपर्यंत थांबावे लागले. त्यानंतर खिडकी उघडली. त्याबाबत कोर्टात कुठल्याच सूचना फलक लावण्यात आल्या नाहीत.
- युवराज पोटे, नागरिक.