उल्हासनगर पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागात
esakal June 02, 2025 01:45 AM

उल्हासनगर पालिकेत शासनाच्या अधिकाऱ्याची एन्ट्री
नीलेश शिरसाठे यांची कार्यकारी अभियंतापदी नियुक्ती,
प्रभारी अधिकाऱ्यांना ब्रेक
उल्हासनगर, ता. १ (बातमीदार) ः महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्यातील २२ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, त्यात नीलेश शिरसाठे यांची उल्हासनगर महानगरपालिकेत कार्यकारी अभियंता या पदावर नियुक्ती केली आहे. या मुख्य पदावर शासनाच्या अधिकाऱ्याची एन्ट्री झाल्याने प्रभारी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांना ब्रेक मिळाला आहे.
महानगरपालिकेत बदली होण्यापूर्वी नीलेश शिरसाठे हे मुंबई सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागात सहाय्यक मुख्य अभियंतापदावर कार्यरत होते. आता त्यांची कार्यकारी अभियंतापदावर एन्ट्री होत असल्याने विशेषतः ते आयुक्त मनीषा आव्हाळे, अतिरिक्त आयुक्त किशोर गवस, उपायुक्त विशाखा मोटघरे यांच्या मार्गदर्शनाखाली अपूर्णावस्थेत किंबहूना प्रगतिपथावर असणाऱ्या रस्त्यांच्या कामांचा प्रश्न शक्य तितक्या लवकर पूर्ण करणार, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
महानगरपालिकेची स्थापना १९९६ मध्ये झाल्यापासून बहुतांश सार्वजनिक बांधकाम विभागातील स्थानिक अधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंतापद हाताळले आहे. त्यात मोहन चिजवानी, सन्मुख सुखरामानी, रमेश शिर्के, भरत बठीजा, महेश सितलानी, संदीप जाधव, तरुण सेवकानी आदींचा समावेश आहे. तसेच शासनाकडून माधव जवादे, भिवापुरकर, गिरगावकर, राम जैसवार, प्रशांत सोलंकी या बोटावर मोजण्याइतपत अधिकाऱ्यांनी पदभार हाताळला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.