भिवंडीतील वऱ्हाळा तलावाच्या गंगास्थानाचे पावित्र्य महापालिका कसे टिकविणार ?
esakal June 02, 2025 01:45 AM

गंगास्थानाचे पावित्र्य संकटात
भिवंडीतील वऱ्हाळा तलावात प्रदूषण, पालिकेचे दुर्लक्ष
पंढरीनाथ कुंभार
कधीकाळी भिवंडी गावाला पाणीपुरवठा करणारे वऱ्हाळा तलाव सध्या प्रदूषित झाला आहे. या तलावात सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यासह इतर कारणाने पाण्यावर शेवाळ्याचे थर साचले आहेत. त्यामुळे भीमेश्वर मंदिरातील गंगेसमान असलेल्या पाण्याचे पावित्र्य संकटात आले आहे.
-------------------------------------------
भिवंडी शहर स्वयंपूर्ण व स्वबळावर प्रगतशील बनलेले शहर आहे. बारा बलुतेदारांच्या वसाहतीचे मुंबईजवळील उद्योगशील शहर म्हणून भिवंडीचे नाव सातासमुद्रापार नेल्याचे ऐतिहासिक दाखले आजही पाहण्यास मिळतात. त्यामुळेच शहरातील वऱ्हाळादेवी मंदिर तसेच वऱ्हाळा तलाव शहराचे ऐतिहासिक ओळख देणारे सन्मानाचे स्थान आहे. शहरातील पुरातन भीमेश्वर मंदिरात दरवर्षी होणारा गंगा दशहरा उत्सव भिवंडीच्या १७५ वर्षांच्या इतिहास आणि परंपरेचा साक्षीदार आहे. इ. स. १८४८ ते १८५० मध्ये भिवंडीत पडलेल्या दुष्काळावर मात करण्यासाठी एक ते दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या वऱ्हाळा तलावाचे पाणी गावातील मूळ लोकवस्तीमध्ये आणण्याचे ठरविले. त्यानुसार वऱ्हाळा तलावाच्या शेजारी असलेल्या श्री वऱ्हाळा देवीच्या देवळासमोर मोठी दगडी टाकी बांधण्यात आली. या टाकीला त्याकाळात खजिना असे म्हणत. तलावाचे पाणी मोटेच्या सहाय्याने खजिन्यात सोडले जात होते. लोखंडी दरवाजा उघडला की टाकीतील पाणी खापरी नळाची, मातीच्या कौलाद्वारे (नजान) पुढे सोडले जात होते. भिवंडी गावात असलेल्या ब्राह्मण आळीतील श्री भीमेश्वर मंदिराच्यासमोर बांधलेल्या दगडी हौदात गोमुखातून पडत असे. या हौदातूनच भिवंडीतील लोकवस्तीमध्ये पाणी पोहोचवले जात होते. तेव्हापासून गंगा गावात अवतरली, असे समजून भीमेश्वर मंदिरात गंगा दशहरा उत्सव सुरू झाला. गेली १७५ वर्षे ही प्रथा श्री भीमेश्वर संस्थानाने जपली आहे.
----------------------------------------------------
नागरिकांना अशुद्ध पाणीपुरवठा
भिवंडी नगरपालिका आणि नगर परिषदेचा कारभार स्वातंत्र्यानंतर केंद्र व राज्य शासनाच्या हाती गेला. त्यानंतर बदलत्या राज्यकारभाराचे चटके भिवंडी महापालिका प्रशासनाने स्थानिक नागरिकांना दिले. १७५ वर्षांपूर्वी मातीच्या कौलातून भिवंडीतील स्थानिक नागरिकांना शुद्ध पाणी मिळत होते. सध्या महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून ठिकठिकाणी जलशुद्धीकरण केंद्र उभारले आहे, पण नागरिकांना अशुद्ध पाणी पुरविले जाते, ही शोकांतिका असून, आजही गंगादशहरा उत्सवात तलावातील पाण्याचे गंगा म्हणून पूजन होते, पण स्थानाचे पावित्र्य जपण्यात महापालिका अपयशी ठरली आहे.
--------------------------------------------------
पाणी शुद्धीकरणाच्या नावाखाली भुर्दंड
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या दुर्लक्षाने शहरातील तलावातील अतिक्रमणामुळे पाणी कमी झाले आहे. निसर्गाने दिलेल्या पाण्यावर गावातील लोक वर्षभर उपजीविका करीत होते. नगर परिषद व नगरपालिका असतानादेखील गाव शहरातील विहिरी आणि वऱ्हाळा तलावाच्या पाण्यावर जगत होते, मात्र महापालिका झाल्यानंतर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी शहरातील लोकांसाठी विविध संस्थांकडून विकतचे पाणी देऊ केले आहे. त्यातच विकतच्या पाण्याचा खर्च, पाण्याच्या शुद्धीकरणाचा खर्च आणि इतर खर्च नागरिकांच्या माथी मारून पिण्यासाठी शुद्धपाणी दिले जात नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.