Kolhapur COVID Update : काेल्हापूरमध्ये कोरोनामुळे वयोवृद्ध महिलेचा मृत्यू: आरोग्य यंत्रणा झाली सतर्क
esakal June 02, 2025 09:45 PM

कोल्हापूर : सीपीआर रुग्णालयात कोरोनामुळे ७५ वर्षीय वयोवृद्ध महिलेचा आज मृत्यू झाला. त्यांना कोरोनासोबत मधुमेह व हायपरटेंशनचा त्रास होता. गेले चार दिवस त्यांच्यावर सीपीआरच्या कोरोना कक्षात उपचार सुरू होते. नव्याने सुरू झालेल्या कोरोनाचा जिल्ह्यातील हा पहिलाच मृत्यू आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.

कोरोनाची लक्षणे दिसत असल्याने त्यांना गुरुवारी रात्री सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी झालेल्या तपासणीत त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून आले. यासोबत वजनही वाढले होते. मधुमेह, उच्चरक्त दाब, अशी लक्षणे दिसत असल्याने मेडिसिन विभागाच्या डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, प्रकृतीत फारसा फरक पडला नाही. दोन दिवस त्यांना ऑक्सिजन पुरवठाही देण्यात आला.

मात्र, आज त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्याचा मृतदेह पिपीई किटमधून द्यावा लागतो. तसेच मृतदेह हाताळणाऱ्यांना पिपीई किट द्यावे लागते. असे पीपीई किट देण्यावरून काही काळ सीपीआरमध्ये वाद सुरू झाला. पीपीई किट महापालिकेने द्यावे, असे सांगण्यात आले. त्यानंतर थोड्याच वेळात सीपीआर रुग्णालय प्रशासनाने पिपीई किट उपलब्ध करून दिली. ‘ सीपीआर रुग्णालयाकडे पीपीई किट उपलब्ध असून, महिलेच्या मृत्यूनंतर थोड्याच वेळात पीपीई किट देण्यात आली,’ असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. बी. मदने यांनी सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.