Nagpur University : नव्या कुलगुरूच्या निवडीचा मार्ग मोकळा, राज्यपालाकडून समिती गठीत; लवकरच येणार जाहिरात
esakal June 03, 2025 04:45 AM

नागपूर : गेल्या सव्वा वर्षांपासून नियमित कुलगुरूंची प्रतिक्षा करीत असलेल्या राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाला नवा कुलगुरू मिळणाचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यपाल कार्यालयाद्वारे शुक्रवारी (ता.३०) निवडीसाठी समिती गठीत केली असून लवकरच पदासाठी जाहिरात काढण्यात येणार आहे.

विद्यापीठाचे दिवंगत कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांचे निलंबन झाल्यानंतर त्यांच्या निधनापासून कुलगुरू पद हे प्रभारींच्या भरवशावर होते. मात्र, आठ महिन्यांपासून नवीन कुलगुरू निवडीसाठीची समिती गठित झालेली नव्हती. दहा महिने प्रभारी कुलगुरू डाॅ. प्रशांत बाेकारे यांनी पदभार सांभाळल्यानंतर अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. माधवी खाेडे-चवरे यांच्याकडे अतिरिक्त प्रभार देण्यात आला. सध्या त्यांच्याच खांद्यावर विद्यापीठाचा भार आहे. दरम्यान आता राज्यपालाने समितीची निवड केली असून त्यात दक्षिण भारतातील एका विद्यापीठाच्या निवृत्त संचालकांच्या अध्यक्षतेखाली ही समिती असल्याची माहिती आहे. निवड समितीची पहिली बैठक झाल्यानंतर कुलगुरू पदाच्या अर्ज प्रक्रियेबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल. आलेल्या अर्जाची छाननी करून समिती उमेदवारांना मुलाखतीसाठी बाेलावेल. त्यापैकी याेग्य आर्हताप्राप्त ५ उमेदवारांची निवड करून राज्यपालांकडे पुढच्या प्रक्रियेसाठी पाठवण्यात येईल. राज्यपाल कार्यालयाद्वारे मुलाखती घेतल्यानंतर कुलगुरू पदावर नियुक्ती केली जाईल.

अशी असते निवड समिती

कुलगुरूंच्या निवडीसाठी राज्यपालांना शिफारस करण्याकरिता समिती स्थापन करण्यात येते. यामध्ये राज्यपाल म्हणजे कुलपतींनी नामनिर्देशित केलेला सदस्य असताे. हा सदस्य एकतर सर्वाेच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश असतात किंवा राष्ट्रीय कीर्तीचा ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ किंवा पद्म पुरस्कारप्राप्त शिक्षणतज्ज्ञ असू शकतात. हाच सदस्य या समितीचा अध्यक्ष असताे. दुसरे सदस्य हे उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव किंवा शासनाने नामनिर्देशित प्रधान सचिव स्तराचे अधिकारी असतात. तिसरा सदस्य विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद व शैक्षणिक परिषदेने नामनिर्देशित केलेली व्यक्ती असतो.

नियम बदलल्याची चर्चा

विद्यापीठ अनुदान आयाेगाने (यूजीसी) कुलगुरू पदासाठीची अर्हता बदलणार असल्याची चर्चा होती. तसेच उद्याेग क्षेत्र किंवा खाजगी संस्थेतील व्यक्तीही कुलगुरू पदासाठी पात्र ठरू शकणार होते. यूजीसीच्या या धाेरणाच्या मंजुरीसाठी विद्यापीठाची कुलगुरू निवड प्रक्रिया थांबवली, अशी चर्चा सुरू होती.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.