Pune : नाट्यगृहात उंदरांचा सुळसुळाट, महिलेच्या साडीत शिरला; नाटकात व्यत्यय नको म्हणून तिने...
esakal June 03, 2025 04:45 PM

नाट्यगृहांच्या दुरावस्थेबाबत याआधी अनेकदा कलाकारांनी नाराजी व्यक्त केलीय. आसनव्यवस्था, सोयीसुविधा, एसी, गलिच्छ स्वच्छतागृह याबाबत अनेकदा तक्रारीसुद्धा केल्या आहेत. दरम्यान, आता पुण्यातल्या कोथरूडमध्ये यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात उंदरांचा सुळसुळाट झाल्याचं समोर आलंय.

यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात शनिवारी एका नाटकाचा प्रयोग सुरू होता. त्यावेळी एका महिला प्रेक्षकाच्या साडीत उंदीर शिरला. प्रयोग सुरू होण्याआधीही नाट्यगृहात सगळीकडे उंदीर फिरत होते. नाट्यगृहातील उंदरामुळे झाले्लया गोंधळाबाबत आता सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झालीय.

महिला प्रेक्षकाच्या साडीत उंदीर शिरल्यानं महिला घाबरली. आपल्यामुळे नाटकात व्यत्यय येऊ नये म्हणून महिला धावतच नाट्यगृहातून बाहेर पडली. महिलेसोबत तिचा पती होता, त्याने ही परिस्थिती संयमाने हातळल्यानं फारसा गोंधळ झाला नाही. पण या सगळ्यात २० मिनिटं गेली. सुदैवाने महिलेला उंदीर चावला नाही. पण त्याची नखे लागली. तसंच महिला या घटनेनं घाबरली होती. तर उंदरांच्या सुळसुळाटामुळे पुन्हा एकदा राज्यातील नाट्यगृहांच्या अवस्थेची चर्चा होत आहे.

एका महिलेसोबत घडलेली ही घटना कुणासोबतही घडू शकते. एखाद्या ज्येष्ठ नागरिकासोबत किंवा लहान मुलासोबत हे घडलं असतं तर गंभीर घटना घडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. ही गंभीर बाब असून नाट्यगृहाच्या व्यवस्थापनाने याची दखल घ्यायला हवी अशी मागणी होत आहे. फक्त नाट्यगृहाचीच नव्हे तर प्रेक्षकांचीही ही जबाबदारी आहे की नाट्यगृहात खाण्याचे पदार्थ नेऊ नये. यामुळे उंदरांचा शिरकाव होण्याची शक्यता वाढते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.