मुंबई : कुरुंदकर याच्यासोबत बोलण्यावरून आपल्या सख्या भाच्याला खोट्या गुन्ह्यात अडकविण्यात आले. मंत्री गिरीश महाजन यांच्या सारख्यांनी माझ्या सख्या भाच्याला खोट्या गुन्ह्यात अडकविल्याने त्याला विनाकारण 7 वर्ष कारागृहात काढावे लागले, असा आरोपच खडसे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. पण खडसेंनी केलेल्या या आरोपाला आता मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. एकनाथ खडसे यांची मानसिक स्थिती आता ठीक नाही, ती बिघडली आहे. ते उद्विग्न झाले आहेत, असा टोला महाजनांनी लगावला आहे. (Girish Mahajan criticizes Eknath Khadse, saying his mental condition has deteriorated)
आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज मंगळवारी (ता. 3 जून) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी केलेल्या आरोपांबाबत विचारणा करण्यात आली. त्यामुळे या आरोपांवर उत्तर देताना महाजन म्हणाले की, खडसे आता उद्विग्न अवस्थेत आहेत. त्यांची मानसिक स्थिती ठीक नाही. त्यांच्या हातामध्ये आता काही राहिलेले नाही. त्यांना आता कोणी निवडून देत नाही, असा टोला महाजनांनी लगावला आहे. तर, त्यांच्या भाच्याने आणि कोणत्या तरी पीआयने मिळून एका महिला पीआयचा खून केला आणि त्यामध्ये ते सहा-सात वर्ष आतमध्ये होते, हे सर्वांना माहीत आहे. त्यांनी त्या महिला इन्स्पेक्टरचा मर्डर केला, त्या अधिकारी महिलेला पाण्यात फेकून दिले. हे सगळं सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहे. आता हे कोणी केले आणि काय केले हे न्यायप्रविष्ट आहे, असे यावेळी मंत्री महाजनांनी म्हटले.
हेही वाचा… Eknath Khadse : यांच्यासारख्यांनी माझ्या भाच्याला…, खडसेंचा मंत्री महाजनांवर गंभीर आरोप
परंतु, त्या केसमध्ये एकनाथ खडसे यांचा भाचा जेलमध्ये गेला. सात वर्ष आतमध्ये राहिला. पण याचाही आरोप ते माझ्यावर करतील, तर मला वाटते की त्यांचे डोके तपासण्याची वेळ आली आहे, असे प्रत्युत्तर मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे. त्यामुळे त्यांच्या या प्रत्युत्तराला आमदार एकनाथ खडसे काय प्रत्युत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मंत्री गिरीश महाजन आणि राज्याच्या राजकाराणातील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यातील वाद हे सर्वांनाच माहीत आहे. विधानसभा निवडणुकीवेळीही खडसेंना भाजपामध्ये प्रवेश करायचा होता. हा प्रवेश जवळपास निश्चितही झाला होता, कारण खडसेंनी त्यावेळी केंद्रीय मंत्री अमित शहांची भेट घेतली होती. पण पक्षातील इतर काही नेत्यांमुळे त्यांचा हा प्रवेश आजपर्यंत रखडला असल्याची माहिती आहे. पण आता खडसेंनी भाजपा नेते, सरकारमधील मंत्री गिरीश महाजन यांच्यावर केलेल्या आरोपामुळे खळबळ उडाली आहे.