माध्यमिक शिक्षकांच्या गुरुवारी पगारी! शासनाकडून २८ मे रोजी आला निधी; टप्पा अनुदानावरील 'इतक्या' शाळांना पगारीसाठी पहावी लागणार वाट
esakal June 04, 2025 01:45 PM

तात्या लांडगे

सोलापूर : जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांच्या पगारीसाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला आहे. वेतन अधीक्षकांनी माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांची पगारबिले कोषागार (ट्रेझरी) कार्यालयात पाठविली आहेत. त्यांचा पगार गुरूवारी (ता. ५) होईल, अशी माहिती वेतन अधीक्षक कार्यालयाने दिली.

सोलापूर जिल्ह्यातील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांमधील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या १६ हजारांपर्यंत आहे. त्यांच्या वेतनासाठी दरमहा साधारणत: ११२ कोटी रुपये लागतात. जिल्ह्यात सोलापूर शहरातील विजयपूर रोडवरील एकमेव माध्यमिक सैनिक शाळा असून नगरपालिका व महापालिकेच्या माध्यमिक शाळा अवघ्या सहा आहेत. याशिवाय टप्पा अनुदानावरील शाळा, कनिष्ठ महाविद्यालये किंवा त्या शाळांमधील टप्पा अनुदानावरील तुकड्यांवरील शिक्षकांच्या पगारीसाठी देखील आता निधी आला आहे.

पण, टप्पा अनुदानावरील १२४ माध्यमिक शाळांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी साडेचार कोटी रुपये लागणार आहेत, पण शासनाकडून तुर्तास तीन कोटी ७० लाख रुपयेच आले आहेत. उर्वरित ४२ शाळांमधील कर्मचाऱ्यांचे वेतन पुढे निधी आल्यावर होणार आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसह खासगी प्राथमिक शिक्षकांच्याही पगारी एक-दोन दिवसातील होतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

वेतनासाठी लागणारा निधी

  • माध्यमिक शाळा : ८८ कोटी रुपये

  • कनिष्ठ महाविद्यालय : १०.७७ कोटी रुपये

  • टप्पा अनुदानावरील महाविद्यालये : २.६० कोटी रुपये

  • टप्पा अनुदानावरील माध्यमिक शाळा : ४.५० कोटी रुपये

  • सैनिकी व नगरपालिका, महापालिकांच्या माध्यमिक शाळा : ५२ लाख रुपये

गुरुवारी होईल सर्वांचे वेतन

माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी निधी प्राप्त झाला आहे. त्या सर्वांची बिले ट्रेझरीत पाठविली असून गुरुवार सायंकाळपर्यंत सर्वांचे वेतन होईल.

- दिपक मुंढे, वेतन अधीक्षक (माध्यमिक), सोलापूर

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.