वास्को: मुरगाव पालिका मंडळाच्या घन कचरा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. दारोदारी कचरा गोळा करण्यासाठी येणाऱ्या कामगारांकडे जे कोणी आपला कचरा देत नाही, त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बांधकामांचे टाकाऊ साहित्य, पालापाचोळा, कापण्यात आलेल्या झाडांच्या फांद्या, चिखल वगैरेंची उचल सफाई कामगारांनी केली पाहिजे. त्यासंबंधी पालिका घन कचरा करार, नियमांनुसार संबंधित कंत्राटदारांना निर्देश देण्याबाबत चर्चा करण्यात आली.
या बैठकीला नगराध्यक्ष गिरिष बोरकर, मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक, घन कचरा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व नगरसेवक नारायण बोरकर, नगरसेविका शमी साळकर, नगरसेवक यतीन कामुर्लेकर, नगरसेविका मंजूषा पिळणकर, नगरसेविका देविता आरोलकर, नगरसेविका कुणाली मांद्रेकर, अभियंता आगुस्तिनो मिस्किता, पालिका अभियंता अनिकेत नाईक, पालिका अभियंता जगदीश गावकर, सॅनिटरी इन्स्पेक्टर महेश कुडाळकर, ऑटोमोबाईल अभियंता अक्षय मडकईकर, पालिकेचे सुपरवायझर, रतन एंटरप्रायझेजचे कंत्राटदार वगैरे उपस्थित होते.
कचरा संकलनासाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदारांमध्ये हितसंबंधांचा संघर्ष असल्याने कंत्राटदार मेसर्स बापू एन्व्हायर्नमेंटल सर्विसला त्याच्या कामांसंबंधी लेखी सूचना देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच योग्य निर्णयासाठी पालिका मंडळाच्या हा विषय मांडून संबंधित कंत्राटदाराची सेवा समाप्त करण्यावर चर्चा झाली. कचरा गोळा करण्यासाठी लहान रिक्षा तैनात करण्यात येईल.
३८ कंत्राटी कामगार तैनात
नगरसेविका शमी साळकर यांनीही कचरा उचल त्वरित व्हावी, यासाठी कचरा वाहनावर ३८ कंत्राटी कामगार तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले. त्यामुळे पाच कामगारांचा समावेश असलेले एक पथक आळीपाळीने निरनिराळ्या प्रभागांमध्ये तैनात करण्यात येईल.
जेणेकरून कचरा सुरळीतपणे उचलण्यास मदत होईल असे सांगितले. प्रत्येक प्रभागातील कचरा उचल त्वरित होते की नाही, यासंबंधी लक्ष ठेवण्याची गरज काहीजणांनी व्यक्त केली. दारोदार कचरा गोळा करण्यासाठी येणाऱ्या कामगाराकडे कचरा न देणाऱ्या व्यक्तींचे पाणी, वीज संबंधीची एनओसी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.