नाशिक- शहरात गेल्या काही दिवसांमध्ये खून, प्राणघातक हल्ल्यांच्या घटना वाढल्या असताना, क्षुल्लक कारणांवरून वा जुन्या भांडणाच्या कुरापती काढून हाणामारीच्या घटना वाढल्या आहेत. हाणामारीच्या घटनांमध्ये संशयितांकडून धारदार हत्यारांचा सर्रास वापर करत दुखापती केल्या जात आहे. पोलिस ठाणेनिहाय गस्ती असतानाही अशा घटना घडत असल्याने शहरात गुन्हेगारी डोकेवर काढत असून वाढलेली ही गुन्हेगारी कमी करण्याचे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे.
शहर पोलिस आयुक्तालय हद्दीत पाच महिन्यात २६ खून झाले आहेत. तर प्राणघातक हल्ल्यांचे प्रमाणही वाढले आहे. शहरात क्षुल्लक कारणांवरून वाद होऊन त्यातून हाणामारीच्या घटना घडत असून यात संशयितांकडून हत्यारांचा वापर होतो आहे. या गंभीर दुखापतीच्या घटनांमुळे नाशिककरांमध्ये भीती निर्माण होत आहे.
भांडे न घासल्याने मारहाण
गोदाघाटावरील टाळकुटेश्वर पुलाखाली ‘तू भंडाऱ्याच्या कार्यक्रमाचे भांडे का घासले नाही’, असे विचारत चौघांनी एकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत धारदार वस्तूने कपाळावर दुखापत केली. टाळकुटेश्वर पूल परिसरात रविवारी (ता.१) रात्री दहा वाजता हा प्रकार घडला. कृष्णा विजय पवार (२६, रा. शिवाजी चौक, जुने नाशिक) याच्या फिर्यादीवरून अनिकेत आमले, आदित्य आमले, अभिजित आमले व श्रवण गावित या संशयितांविरुद्ध पंचवटी पोलिसांत दुखापतीचा गुन्हा नोंद आहे.
पूर्ववैमनस्यातून गंभीर दुखापत
नांदूर नाका येथील महापालिकेच्या उद्यानात बसलेल्या युवकाला सराईत गुन्हेगाराने जुन्या भांडणाची कुरापत काढून लाकडी दांड्याने मारून गंभीर दुखापत केली. प्रकाश विसपुते ऊर्फ पक्या खटकी असे सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. अक्षय बाळकृष्ण गोहाड (२७, रा. अमृतधाम, पंचवटी) यांच्या फिर्यादीनुसार, रात्री अकराला अक्षय उद्यानात पावभाजी खात असताना, संशयित पक्या खटकी त्याठिकाणी आला आणि त्याने मागील भांडणाची कुरापत काढून लाकडी दांडक्याने मारहाण केली. यात त्याच्या जबड्याला फॅक्चर झाले. याप्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
कार्यालयाची तोडफोड
नाशिक रोड तरण तलाव येथे कार्यालयात घुसून संशयितांनी राडा घातला. अनिल गायखे, यश गायखे, ओम गायखे, अनिल गायखे (सर्व रा. गायखे कॉलनी, नाशिक रोड) असे संशयितांची नावे आहेत. संशयित यांनी तरण तलाव येथे असलेल्या कार्यालयात जात या ठिकाणी असलेल्या साहित्याची तोडफोड केली. तसेच याठिकाणी असलेल्या महिला व मुलींना शिवीगाळ करत विनयभंग केला. तसेच पीडित महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत ओरबाडून नेली. याप्रकरणी उपनगर पोलिसात जबरी चोरीसह विनयभंग केला. सहायक निरीक्षक वायकर हे करीत आहेत.