पुणे - रंगकाम करताना तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्यामुळे एका ३० वर्षीय मजुराचा मृत्यू झाला. ही घटना कोथरूडमधील रामबाग कॉलनीतील एका सोसायटीत घडली. या प्रकरणी संबंधित ठेकेदाराने मजुराला कोणतीही सुरक्षाविषयक साधने न दिल्यामुळे त्यांच्याविरोधात कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
जगतमुरत गुलाब निषाद (वय ३०, रा. केळेवाडी, कोथरूड, मूळ रा. चित्रकूट, उत्तर प्रदेश) असे मृत मजुराचे नाव आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार अडागळे यांनी फिर्याद दिली आहे.
त्यावरून अनिकेत ज्ञानेश्वर गढई (वय २५, रा. पंडित नेहरूनगर, कर्वे रस्ता) आणि यशवंत प्रभाकर देशपांडे (वय ५३, रा. सुवर्णरत्न गार्डन, कर्वेनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामबाग कॉलनीतील उमा महेश को-ऑप. गृहनिर्माण सोसायटीतील इमारतीचे २० एप्रिलला दुपारी रंगकाम सुरू होते.
त्यावेळी निषाद तिसऱ्या मजल्यावरून तोल जाऊन खाली पडला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे निषादचा बळी गेल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक अडागळे करीत आहेत.