छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र पब्लिक स्कूलचा विद्यार्थी आराध्य बोर्डे याने दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नाव कोरले आहे. सिंगापूर येथील नामांकित ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल (जीआयआयएस) संस्थेने आराध्यला पुढील शिक्षणासाठी एक कोटी रुपयांची ‘ग्लोबल सिटीझनशिप स्कॉलरशिप’ जाहीर केली आहे.
जगभरातील ११ हजार अर्जदारांमधून केवळ १५ विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली असून, त्यामध्ये आराध्यचा समावेश होणे ही महाराष्ट्रासाठी आणि शाळेसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
या स्कॉलरशिपसाठी सिंगापूर आणि बेंगळुरू येथील प्रत्येकी पाच विद्यार्थ्यांची निवड झाली असून, उर्वरित पाच जागांवर विविध देशांतील हुशार विद्यार्थी निवडले गेले आहेत. आराध्य बोर्डे हा या अंतिम यादीतील एकमेव मराठी विद्यार्थी असून, त्याला बेंगळुरू येथील जीआयआयएस शाळेमध्ये आयबी डिप्लोमा प्रोग्राम (आयबीडीपी) साठी ६० लाख रुपयांची स्वतंत्र स्कॉलरशिपदेखील मंजूर झाली आहे.
आराध्यने याआधी शालेय जीवनातही नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत नेतृत्वगुण दाखवले आहेत. त्याने वर्गमित्रांच्या मदतीने निवडणूक प्रक्रिया समजावणारे ॲप तयार केले होते, ज्याला राज्यस्तरावर कौतुक मिळाले.
तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘आयआयएमयुएन’ या शालेय उपक्रमामध्येही त्याने सक्रिय सहभाग घेतला होता. हाच अनुभव त्याच्या संवादकौशल्यांना धार देणारा ठरला. स्कॉलरशिपच्या निवड प्रक्रियेबाबत बोलताना आराध्यने सांगितले की, ही प्रक्रिया पाच टप्प्यांत विभागली होती.
प्रवेश परीक्षा, सहशैक्षणिक कामगिरीचे मूल्यांकन, तसेच ऑनलाइन आणि प्रत्यक्ष मुलाखती अशा विविध टप्प्यांत आपली गुणवत्ता सिद्ध केली. सर्व टप्प्यांत यश मिळवत अंतिम यादीत स्थान मिळवले.
त्याच्या या आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीमुळे संपूर्ण जिल्ह्यातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. येत्या काळात तो आणखी मोठ्या यशाची शिखरे गाठेल, असा विश्वास त्याच्या शिक्षकांनी आणि पालकांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र पब्लिक स्कूलमध्ये केवळ पुस्तकी शिक्षणापुरते न थांबता ‘Project Based Learning’, सहशालेय आणि अतिरिक्त उपक्रमांवर विशेष भर दिला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सखोल विषयज्ञानासह जीवनकौशल्ये आणि प्रभावी संवादकौशल्ये विकसित होतात. त्यांना योग्य दिशा, संधी आणि प्रेरणा देण्यासाठी संस्था कटिबद्ध आहेत.
- अशोक मुंढे, संस्थाध्यक्ष तथा माजी अप्पर जिल्हाधिकारी