Panchayat Election : भाजप-धजदची स्वतंत्र निवडणूक लढवण्याची तयारी; राजकीय घडामोडींना वेग, लवकरच जाहीर होणार पंचायत निवडणुका!
esakal June 05, 2025 05:45 PM

बंगळूर : जिल्हा आणि तालुका पंचायत निवडणुका (Jilha-Taluka Panchayat Election) लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून, (BJP) आणि धजद (JDS) हे मित्रपक्ष स्वतंत्रपणे या निवडणुका लढवण्याची तयारी करीत असल्याची सूत्रांची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप आणि धजदने युती केली आणि त्यानंतरच्या सर्व निवडणुका, ज्यामध्ये विधानसभा पोटनिवडणुकांचा समावेश होता, दोघांनीही सहयोगी पक्ष म्हणून लढवल्या.

धजदच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले की, पक्षातील अंतर्गत चर्चेदरम्यान अनेकांनी आम्हाला स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला आहे, परंतु अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडताना आम्ही भाजपसोबत आघाडीचा पक्ष म्हणून पुढे येऊ. दोन्ही पक्ष निवडणूक लढवतील आणि ही ‘मैत्रीपूर्ण लढाई’ असेल. अनेक राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष नाहीत, परंतु कर्नाटकमध्ये निवडणुका हरल्यानंतरही जुन्या म्हैसूर प्रदेशावर आमचा अजूनही ताबा आहे. एनडीएचा भागीदार म्हणून आम्ही विधानसभा आणि इतर निवडणुका एकत्र लढवू.

पक्षाचे सरचिटणीस आणि कर्नाटक प्रभारी राधा मोहनदास अग्रवाल यांच्या भेटीनंतर भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारीही करत आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र म्हणाले, ‘आमचा राष्ट्रीय पक्ष आहे. जेव्हा राज्य सरकार जिल्हा पंचायत-तालुका निवडणुका जाहीर करते, तेव्हा आमचे राष्ट्रीय नेते निर्णय घेतात. आम्ही त्यांच्या सूचनांचे पालन करू.’

२०१६ मध्ये शेवटच्या निवडणुका

राज्यात १,१३० जिल्हा पंचायत आणि ३,६७१ तालुका पंचायत मतदारसंघ आहेत. पंचायत निवडणुका शेवटच्या २०१६ मध्ये झाल्या होत्या. पुढील निवडणुका २०२१ मध्ये होणार होत्या. तथापि, न्यायालयीन प्रकरणे, कोविड आणि मतदारसंघांचे सीमांकन यांसह विविध कारणांमुळे निवडणुका लांबल्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.