Bangalore Stampede : मोफत तिकिटाच्या अफवेनं गेले जीव! चिन्नास्वामी स्टेडियमचं 'हे' गेट बनलं मृत्यूचं दार, नेमकं काय घडलं?
esakal June 05, 2025 05:45 PM

बंगळूर : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू म्हणजेच आरसीबीचा आयपीएलमधील विजयोत्सव आता एका शोकांतिकेत बदलला आहे. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर (Chinnaswamy Stadium) गेट क्रमांक ७ जवळ झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला असून ५० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी संध्याकाळी बंगळूरमध्ये घडली आहे.

मोफत तिकिटांची अफवा ठरली जीवघेणी

या चेंगराचेंगरीचे मुख्य कारण ठरली एक अफवा! स्टेडियमच्या गेट क्रमांक ७ जवळ मोफत तिकिटे दिली जात असल्याची अफवा काही क्षणांतच मोठ्या प्रमाणात पसरली. ही माहिती मिळताच, हजारो चाहते तिकडे धावू लागले. विशेषतः (Virat Kohli) व RCB संघाच्या चाहत्यांनी मोठ्या संख्येने एकाच वेळी प्रवेशद्वार गाठले आणि तिथून सुरू झाला मृत्यूचा तांडव.

गर्दीमध्ये अफरातफरी माजली. लोक एकमेकांवर आदळू लागले, धक्काबुक्की सुरू झाली आणि काही सेकंदांतच अनेक जण चिरडले गेले. काही जणांना श्वास घेणेसुद्धा अवघड झाले होते, तर काहीजण बेशुद्ध पडले.

इतर गेटवरही गर्दी, पण सर्वात धोकादायक 'गेट क्रमांक ७'

RCB संघाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे जाणाऱ्या गेट क्रमांक १२, १३, १४ आणि १५ वरही मोठी गर्दी होती. मात्र, मृत्यूचा सर्वाधिक फटका बसला तो गेट क्रमांक ७ ला. कारण, याच ठिकाणी मोफत तिकिटांची अफवा पसरली होती.

प्रशासनाच्या तयारीवर प्रश्न

या घटनेमुळे पोलिस व प्रशासकीय यंत्रणेच्या तयारीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलिसांनी गर्दी नियंत्रणासाठी ५,००० हून अधिक कर्मचारी तैनात केल्याचा दावा केला होता. मात्र, प्रत्यक्षात ही अफवा का आणि कशी पसरली याची माहिती नसल्याचे अधिकार्यांकडून सांगण्यात आले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.