
मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता शाइन टॉम चाको याचा भीषण अपघात झाला आहे. शुक्रवारी सकाळी तामिळनाडूच्या धर्मपुरी जिल्ह्यात झालेल्या या अपघातात अभिनेत्याचे वडील सीपी चाको यांचे निधन झाले. तर शाइन टॉम चाको याच्यासह त्याची आई मारिया आणि भाऊ गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर रुग्णआलयात उपचार सुरू आहेत. ‘एनडीटीव्ही’ने याबाबत वृत्त दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शाइन टॉम चाको हा कुटुंबासोबत कारने प्रवास करत होता. याचवेळी धर्मपुरी जिल्ह्यातील पलाकोडजवळील परायू येथे महामार्गावर कार आणि ट्रकची धडक झाली. यात अभिनेत्याच्या वडिलांचा जागीच मृत्यू झाला. तर शाइन टॉम चाको, त्याची आई, भाऊ आणि चालक गंभीर जखमी झाले. जखमींवर सध्या पलाकोट्टई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.