पुणे: राज्यभरात महिलांवर होणाऱ्या छळ आणि त्रासाला कंटाळून महिला आपलं जीवन संपवत असल्याच्या संतापजनक घटना समोर येत आहेत. अशातच कामाच्या ठिकाणी देखील महिला अधिकाऱ्याचा छळ केल्याची माहिती समोर आली आहे. भाजप पदाधिकाऱ्यांकडून महापालिकेच्या वैद्यकीय महिला अधिकाऱ्याचा छळ आणि अरेरावी केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत वरिष्ठांना तक्रार केली असून आयुक्तांकडे देखील तक्रार करून अद्याप कारवाई झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर अखेर महिला अधिकाऱ्याने राज्य महिला आयोगाकडे धाव घेतली.
मागील चार महिन्यांपासून पदाधिकारी वेगवेगळ्या कारणाने त्रास द्यायचा अशी माहिती समोर आली आहे. ओमकार कदम असं भाजप पदाधिकाऱ्याचं नाव आहे. तो थेट केबिनमध्ये घुसून जाब विचारायचा. घरासोबतच महिलांना कामाच्या ठिकाणीही छळाला सामोरं जावं असल्याचं आता दिसून येत आहे.
पुणे महापालिकेत खुनाचा गुन्हा दाखल असलेल्या कामगार आघाडीच्या भाजप पदाधिकाऱ्याने वैद्यकीय महिला अधिकाऱ्याचा छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. महिला अधिकाऱ्याचा छळ केल्याप्रकरणी महापालिकेच्या महिला समितीकडे, सुरक्षा विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. मात्र त्यावर कोणीही कारवाई केली नाही. अखेर या महिला अधिकाऱ्याने महिला आयोगाकडे धाव घेतली आहे. आता महिला आयोगाकडून महापालिकेत प्रकरणाची चौकशी सुरू आहे. सुरक्षा विभागाकडूनही शिवाजीनगर पोलिसांना गोपनीय पत्र आणि नोटिस देण्याशिवाय कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. या भाजप पदाधिकाऱ्याला अभय कोण देत आहे? आणि महिला अधिकाऱ्याची गंभीर तक्रारीची महापालिका आयुक्तांनी त्याच वेळी दखल का घेतली नाही? असे प्रश्न उपस्थित होत आहे.
भारतीय जनता पक्षाचा (भाजप) एक पदाधिकारी आपला छळ करत असल्याची तक्रार महापालिकेतील एका महिला अधिकाऱ्याने राज्य महिला आयोगाकडे आहे. आयोगाने याची दखल घेऊन, आयोगातील पदाधिकाऱ्यांनी याबाबत महापालिकेत जाऊन माहिती घेतली आहे.
याबाबत संबंधित महिलेने जानेवारी महिन्यात महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार केली. काम करताना सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी कार्यवाहीकरण्याची विनंती केली होती. तसेच महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अंतर्गत महिला तक्रार निवारण समितीकडेदेखील तक्रार दिली होती. या तक्रारीवर समितीसमोर सुनावणी झाली. मात्र, पुढे नक्की काय कारवाई झाली, हे समितीकडून कळविण्यात आले नाही, अशी तक्रार या महिला अधिकाऱ्याने केली. तक्रारीनंतरदेखील संबंधित पदाधिकारी कार्यालयात येऊन त्रास देत असल्याने महिलेने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्याकडे याबाबत लेखी तक्रार दाखल केली. य तक्रारीची तातडीने दखल घेऊन आयोगाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात महापालिकेला भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांकडून तसेच महापालिकेतील इतरांकडून माहितीदेखील घेतली आहे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या माहितीला दुजोरा दिला.
आणखी वाचा