त्रिनमूलचे खासदार महुआ मोत्रा ​​लग्न करतात
Marathi June 06, 2025 02:25 PM

बीजेडीचे नेते पिनाकी मिश्रा यांच्याशी जुळवले नातेबंध

वृत्तसंस्था/कोलकाता

वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांचा विवाह झाला आहे. ओडिशातील बिजू जनता दलाचे नेते आणि माजी लोकसभा सदस्य पिनाकी मिश्रा यांच्याशी त्यांनी विवाह केल्याचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. हा विवाह परदेशात झाल्याचे समजते. मात्र, अद्याप या दोन्ही नेत्यांनी विवाहाच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. मात्र, त्यांच्या विवाहाचे छायाचित्र सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्याने त्यांच्या संबंधात बरीच चर्चा होत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार त्यांच्या विवाहाचे वृत्त सत्य असून विवाह सभारंभ भारताबाहेर झाला. महुआ मोईत्रा या 50 वर्षांच्या असून त्या पश्चिम बंगालमधून दोनदा लोकसभेवर खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. लोकसभेतील जहाल भाषणांमुळे त्या प्रसिद्ध आहेत.

त्यांच्यावर सांसदीय नियमांचा भंग केल्याचा आरोपही करण्यात आला होता आणि त्यांच्यावर कारवाईही करण्यात आली होती. त्या अर्थशास्त्र या विषयातील पदवीधर आहेत. त्यांनी त्याच्या करीअरचा प्रारंभ बँकिंग क्षेत्रातून केला होता. नंतर त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. प्रथम त्या आमदार म्हणून विधानसभेवर निवडून आलेल्या होत्या. त्यांचे पती पिनाकी मिश्रा हे 65 वर्षांचे असून ते इतिहास या विषयाचे पदवीधर आहेत. ते ओडिशातील बिजू जनता दल या पक्षाचे नेते असून त्या पक्षाचे माजी खासदारही आहेत. त्यांनी या पक्षाचे उमेदवार म्हणून चारवेळा लोकसभा निवडणूक जिंकली आहे. अनेक सांसदीय समित्यांवर त्यांनी काम केले असून ते सक्षम खासदार म्हणून ओळखले जात होते. मात्र, या दोन नेत्यांच्या विवाहाविषयी मोठी गुप्तता पाळण्यात आली होती. त्यामुळे अद्यापही या विवाहाची विशेष माहिती समोर आलेली नसल्याने त्यासंबंधीचे गूढ वाढले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.