अयोध्या : अयोध्येतील रामजन्मभूमीवरील मंदिरात पहिल्या मजल्यावर असलेल्या राम दरबारातील मूर्तींसह या परिसरातील आठ मंदिरांतील मूर्तींची प्राणप्रतिष्ठा आज एकाचवेळी करण्यात आली.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रमुख उपस्थितीत राम दरबारामध्ये राजा राम आणि भगवती सीता यांच्यासह अन्य मूर्तींची विधीवत स्थापना करण्यात आली. गंगा दशहऱ्याचे औचित्य साधत देशभरातून आलेले वैदिक, विविध पंथांचे आचार्य आणि संतमहंतांच्या उपस्थितीमध्ये, राम भक्तीने भारलेल्या वातावरणात प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला.
सकाळी साडे सहा वाजता राममंदिर परिसरातील यज्ञमंडपामध्ये वेदमंत्रांच्या पठणाने आजच्या विधींची सुरूवात झाली. त्यानंतर नऊच्या दरम्यान हवन आणि त्यानंतर अभिजित मूहूर्तावर प्राणप्रतिष्ठा विधी झाला. यावेळी उपस्थित असलेल्या रामभक्तांनी केलेल्या जयघोषाने मंदिर परिसरातील आसमंत दुमदुमुन गेला होता.
ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, मंदिराच्या ईशान्य दिशेला शेषावतार आणि भगवान शंकर, अग्नेय दिशेला गणपती, दक्षिणेला मारुती, नैऋत्येला सूर्य, वायव्य दिशेला देवी भगवती, आणि उत्तरेला अन्नपूर्णा या मूर्तींची मंदिरांमध्ये प्राणप्रतिष्ठा बुधवारी एकाच वेळी करण्यात आली. सर्व ठिकाणच्या प्राणप्रतिष्ठा विधींमध्ये सुसूत्रता राहावी यासाठी सर्व ठिकाणी मोठे स्क्रीन आणि कॅमेरे बसविण्यात आले होते.
असा आहे राम दरबाररामजन्मभूमीवर उभारलेल्या मंदिराच्या तळमजल्यावरील गर्भगृहात, रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मागील वर्षी २२ जानेवारीला झाली होती. ‘हे रामाचे जन्मस्थान असल्याने तळमजल्यावर मुख्य विग्रह बालक राम किंवा रामलल्लाचा असून, पहिल्या मजल्यावर राम दरबार स्थापन केला जाईल,’’ अशी माहिती ट्रस्टने त्यावेळी दिली होती.
त्यानुसार दरबारामध्ये श्रीराम सीता यांच्या सिंहासनाधीश मूर्ती, तसेच भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण व हनुमंत यांच्या मूर्तींची आज प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. तळमजल्यावरील राममूर्ती ही अवघ्या पाच वर्षांच्या रामलल्लांची आहे तर राम दरबारात राजा राम त्यांच्या प्रमुख लीलासहचरांसह विराजमान झाले आहेत, असे सांगण्यात आले आहे.