Piyush Chawla retirement from all forms of cricket at 36
भारताचा फिरकीपटू पियुष चावला याने सर्व फॉरमॅटच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. सोशल मीडियावर पोस्ट लिहून त्याने निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. पियुष हा २०११ च्या वन डे वर्ल्ड कप आणि २००७ च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य होता. त्याने कोलकाता नाइट रायडर्ससह २०१४ मध्ये इंडियन प्रीमिअर लीगचे जेतेपदही पटकावले आहे. त्याने भारतासाठी ३ कसोटी सामन्यांत ७ विकेट्स घेतल्या आहेत. त्याशिवाय २५ वन डे सामन्यांत ३२ व ७ ट्वेंटी-२० सामन्यांत ४ विकेट्स घेतल्या आहेत.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने १३७ सामन्यांत ४४६ विकेट्स घेतल्या आहेत. लिस्ट ए क्रिकेटमध्ये १६४ सामने व ट्वेंटी-२० क्रिकेटमधील २९७ सामन्यांत त्याने अनुक्रमे २५४ व ३१९ विकेट्स घेत्लया आहेत. त्याने लिहिले की, दोन दशकांहून अधिक काळ मैदानावर राहिल्यानंतर, या सुंदर खेळाला निरोप देण्याची वेळ आली आहे. भारताचे सर्वोच्च स्तरावर प्रतिनिधित्व करण्यापासून ते २००७ च्या ट्वेंटी-२० आणि २०११ च्या वन डे वर्ल्ड कप विजेत्या संघाचा भाग होण्यापर्यंत, या अविश्वसनीय प्रवासातील प्रत्येक क्षण हा एका आशीर्वादापेक्षा कमी नव्हता. या आठवणी माझ्या हृदयात कायम कोरल्या जातील.
तो पुढे लिहितो, माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या आयपीएल फ्रँचायझी पंजाब किंग्स, कोलकाता नाइट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांचे मी मनापासून आभार मानतो. इंडियन प्रीमियर लीग माझ्या कारकिर्दीतील खरोखरच एक खास अध्याय आहे आणि त्यात खेळण्याचा प्रत्येक क्षण मी जगलो आहे. मी माझे प्रशिक्षक के.के. गौतम आणि दिवंगत पंकज सारस्वत यांचे मनापासून आभार मानतो.
माझे कुटुंब या प्रवासात नेहमी माझ्या पाठीशी सक्षमपणे उभा राहिले आहे. माझ्या दिवंगत वडिलांचा विशेष उल्लेख करेन, ज्यांच्या माझ्यावरील विश्वासाने मला इथपर्यंत पोहोचवले. त्याच्याशिवाय हा प्रवास कधीच शक्य झाला नसता. मी बीसीसीआय, उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशन आणि गुजरात क्रिकेट असोसिएशन यांचेही आभार मानतो की त्यांनी मला एक क्रिकेटपटू म्हणून विकसित होण्यासाठी आणि मला घडवण्यासाठी व्यासपीठ दिले.
त्याने पुढे लिहिले की, आज माझ्यासाठी एक भावनिक दिवस आहे, कारण मी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक क्रिकेटमधून अधिकृतपणे निवृत्ती जाहीर करत आहे. मी जरी मैदानापासून दूर गेलो तरी, क्रिकेट मा्या हृदयात नेहमी राहील. मी एका नवीन प्रवासाला सुरुवात करण्यास उत्सुक आहे.