कोल्हापूर : सोळा वर्षीय मुलाचे मित्र त्याच्यापेक्षा वयाने मोठे, वर्गातील मुले चैनी करतात; पण आपल्याकडे पैसै नसल्याची खंत, घरच्यांकडे पैसे मागावेत तर वडिलांवरच घरखर्चाचा डोंगर, अशात केवळ संगतीमुळे त्याने चोरीचे धाडस केले. शेजारी गावी गेल्याचे पाहून गॅलरीच्या खिडकीतून शिरून दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला मारला. पिझ्झा खाण्यासह मॉलमध्ये खरेदीत पैसे खर्चू लागला. ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच त्याला ताब्यात घेऊन केलेल्या चौकशीत सोन्या मारुती चौकात झालेल्या १८ तोळे सोने चोरीच्या गुन्ह्याची उकल झाली.
फिर्यादी शुभांगी सुजय म्हेत्रे (वय ५०, रा. सोन्या मारुती चौक, शनिवार पेठ) या २५ ते ३१ मे या कालावधीत बाहेरगावी गेल्या होत्या. ३१ तारखेला रात्री घरी परतल्या असता बेडरूममधील कपाटात ठेवलेले १८ तोळे सोन्याचे दागिने व रोख एक लाख रुपये चोरीस गेल्याचे दिसून आले. या चोरीने त्यांना धक्काच बसला. घराचे कुलूप सुस्थितीत असताना चोरी झाल्याने माहितीतील कोणीतरी चोरी केल्याचे स्पष्ट होते.
लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांनी तपास सुरू केला. मोलकरणीसह अनेकांकडे चौकशी केली असता ठोस पुरावा हाती लागत नव्हता. पोलिस अंमलदार तानाजी दावणे यांना एका अल्पवयीन मुलाविषयी माहिती मिळाली. त्याने ही चोरी केल्याचा संशय आल्याने त्याच्यावर वॉच ठेवण्यात आला होता.
तीन दिवसांत उडवली रक्कमफिर्यादीच्या घरातून एक लाख रुपयांची रोकड चोरीस गेल्याची नोंद झाली आहे, तर संशयित मुलाने आपल्याला केवळ ५० हजार रुपये होते, त्यातील २० हजार रुपयेच खर्च केल्याची कबुली दिली. केवळ तीनच दिवसांत त्याने २० हजार रुपये खर्च केल्याने पालकांनीही डोक्याला हात लावला. मुलाच्या या कृत्याने संपूर्ण कुटुंबालाच मोठा धक्का बसला आहे. बाकी ५० हजार रुपयांचे त्याने काय केले, याचा तपास सुरु आहे.