Sambhajinagar Firing : जुन्या वादातून गोळीबार; मित्रावर झाडल्या तीन गोळ्या, जखमीवर घाटीत उपचार सुरू
esakal June 06, 2025 09:45 PM

गंगापूर : जुन्या वादातून एका मित्राने गावठी पिस्तुलामधून गोळीबार केला. यात एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवारी (ता. पाच) गंगापूर-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील चहाच्या दुकानावर घडली.

गंगापूर तालुक्यातील जामगाव येथील आदिनाथ दिलीप जाधव (वय २४) गुरुवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास चहाच्या दुकानावर थांबला होता. यावेळी त्याचा मित्र महेश काळे तेथे आला. दोघांतील जुन्या वादातून महेशने आदिनाथवर गावठी पिस्तूलमधून तीन गोळ्या झाडल्या. एक गोळी आदिनाथच्या पोटाला, दुसरी मांडीत तर तिसरी हाताला चाटून गेली. घटनेनंतर महेश तेथून पळून गेला.

गंभीर जखमी आदिनाथवर उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल नव्हता. दरम्यान, दोन महिन्यांत जामगाव आणि तांदूळवाडीजवळ गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. सहायक फौजदार दिनकर थोरे यांनी घटनास्थळाचा पंचनामा करत दोन जिवंत काडतुसे आणि पुंगळ्या जप्त केल्या.

गावठी कट्टा बाळगणारे जेरबंद

बिडकीन शेकटा फाटा शिवारात पोलिस पेट्रोलिंग करत असताना गावठी कट्टा, कोयता बाळगणारे तरुण आढळून आले. पोलिसांनी कारवाई करत चार लाख ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवारी मध्यरात्री करण्यात आली.

धारदार शस्त्र घेऊन येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. शेकट्याकडून बिडकीनकडे येणाऱ्या कारची (एमएच ०८ झेड ५०६७) पंचासमक्ष झडती घेतली असता गावठी कट्टा, लोखंडी मॅगझिन, सुरा, एअर गण, लोखंडी धातूचा सत्तूर, लोखंडी धातूचा सुरा आढळून आला. कारसह सर्व मुद्देमाल जप्त केला.

सचिन आप्पासाहेब काळे (वय २६), रोमन हरी शिंदे (२६), संदीप तुळशीराम खंडागळे (२६), किशोर तुळशीराम मुके (२३, सर्व रा. मांडवा, ता. ) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. आरोपींविरोधात बिडकीन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सपोनि नीलेश शेळके, पोउपनि महेश घुगे, विष्णू गायकवाड, सूरज ढवळे, योगेश वाघमोडे यांनी केली. पोलिस उपनिरीक्षक महेश घुगे तपास करत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.