मुंबई : मुंबई महापालिका पर्यावरण संरक्षणासाठी बळकटी देत आहे. या प्रयत्नाचा एक भाग म्हणून यंदाच्या वातावरणीय अर्थसंकल्पात भांडवली आणि महसुली खर्चात वाढ करण्यात आली आहे. घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचऱ्यांचे संकलन’ यांसारखे उपक्रम राबविले जात असल्याची माहिती पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी दिली.
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने डॉ. जोशी यांच्या हस्ते मुंबई महानगरपालिकेचा ‘वातावरणीय अर्थसंकल्प अहवाल - २०२५-२६’ आज भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय येथील पेंग्विन सभागृहात प्रकाशित करण्यात आला. यावेळी उपायुक्त राजेश ताम्हाणे, प्रमुख अभियंता अविनाश काटे, प्रमुख अभियंता प्रचिती देसाई, प्रादेशिक नागरी व पर्यावरण अभ्यास केंद्राचे संचालक डॉ. अजित साळवी आदी उपस्थित होते.
डॉ. अश्विनी जोशी पुढे म्हणाल्या, वातावरणीय अर्थसंकल्प २०२५-२६ साठी पालिका तसेच बेस्ट उपक्रम यांच्याकडून आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये भांडवली खर्चासाठी १७,०६६.१२ कोटी आणि महसूली खर्चासाठी ३,२६८.९७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
एकल वापराच्या प्लास्टिकचा सर्वाधिक परिणाम सहन करावा लागतो आहे. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करताना नाल्यांतून गाळांपेक्षा कितीतरी जास्त प्लास्टिकच्या पिशव्या आढळून येत आहेत. प्लास्टिकचा वापर करू नये, यासाठी प्रशासनाकडून सक्ती आणि कारवाई सुरू आहे.
हवामान बदलामुळे होत असलेल्या शहराच्या उष्णतावाढीसंदर्भातील उपाययोजनासाठी पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग प्रयत्नरत आहे. यासाठी या क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा विद्यार्थ्यांनी विविध रंगसंगतीपूर्ण छत किंवा आच्छादनांशी संबंधित नवनवीन संकल्पना समोर आणाव्यात, असेही डॉ. जोशी म्हणाल्या.
वातावरण कृती आराखड्यामध्ये वातावरणविषयक ‘लक्ष्य’ निश्चित करण्यात आली आहेत. ही लक्ष्ये पालिकेच्या वातावरणीय अर्थसंकल्प अहवालात समाविष्ट करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या वतीने २०२४-२५ पासून वातावरणीय अर्थसंकल्प अहवाल प्रकाशित करण्यात येत आहे. यंदा या अर्थसंकल्प अहवालाचे दुसरे वर्ष आहे.
वातावरणीय अर्थसंकल्प तयार करण्याबाबत जागतिक स्तरावर हाती घेण्यात आलेल्या सी-४० शहरे या उपक्रमांचा मुंबईसुद्धा एक भाग आहे. यापूर्वी ऑस्लो, लंडन आणि न्यूयॉर्क या शहराशी संबंधित प्रशासनाकडून वातावरण अर्थसंकल्प अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. अशाप्रकारचा अहवाल प्रकाशित करणारे मुंबई हे जागतिक स्तरावरील आता चौथे शहर बनले आहे.
ठळक वैशिष्ट्येपालिका तसेच बेस्ट उपक्रम (बेस्ट) यांनी आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये भांडवली खर्चासाठी १७,०६६.१२ कोटी आणि महसूली खर्चासाठी ३,२६८.९७ कोटी रुपयांची तरतूद
गेल्या वर्षी एकूण ३१,७७४.६४ कोटी रुपयांच्या भांडवली अर्थसंकल्पीय अंदाजात १०,२२४.२४ कोटी रुपयांची तरतूद (३२.१८ टक्के) वातावरण अनुकूल बाबींशी संलग्नित होती.
पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाचा वाढलेला अर्थसंकल्प आणि पालिकेच्या २० मूळ विभागांच्या नवीन उपक्रमांमुळे ही वाढ झाली आहे.
आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी महसुली अर्थसंकल्पात वातावरण अनुकूलतेच्या अनुषंगाने ५.६३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये नियोजन विभाग तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वातावरण अनुकूल उपक्रमांचा समावेश आहे.
बेस्ट उपक्रमाने एकूण १,८४९.२४ कोटी रुपये भांडवली खर्चापैकी ४० टक्के म्हणजे ७४४.८ कोटी रुपयांची वातावरण-अनुकूल उपक्रमांसाठी तरतूद केली आहे.