बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील गीता गावातील शुभांगी शिंदे आत्महत्या प्रकरणात आता एक गंभीर राजकीय वळण पाहायला मिळत आहे. या प्रकरणात पोलिसांनी तपास करून चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. तर, पाचवा आरोपी फरार आहे. हा पाचवा आरोपी भाजपचा धारूर तालुकाध्यक्ष असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात त्याचाही सहभाग असल्याची माहिती आहे. सध्या तो फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
भाजप पदाधिकारी फरार
ठाण्याचे अधिकारी सांगतात, संदीप काचगुंडे याच्या शोधासाठी दोन पोलीस पथक तयार करण्यात आले आहे. तो ज्या दिशेने पसार झाला असेल, त्या भागात शोध मोहीम राबवली जात आहे. मात्र, त्याच्या फरार होण्यामागे राजकीय आश्रय आहे का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
शुभांगी शिंदेने सासरच्या छळाला कंटाळून घेतला गळफास
अंबाजोगाई तालुक्यातील गीता गावात राहणाऱ्या शुभांगी शिंदे हिने गळफास घेत आत्महत्या केली आहे. सासरच्या मंडळींकडून वारंवार पैशांची मागणी केली जात होती. याच त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली. तिच्या माहेरच्यांनी आरोप केला आहे की, आधीच चार लाख रुपये दिल्यानंतरही आणखी दोन लाख रुपयांची मागणी केली जात होती.
या घटनेनंतर शुभांगीचा भाऊ प्रदीप सोळंके यानं तक्रार दाखल केली. दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी तात्काळ तपास करीत चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. शुभांगीचा पती संतोष शिंदे, सासरे विलास शिंदे, सासू सुमन शिंदे आणि नणंद सीमा शिंदे यांना अटक केली आहे. मात्र, पाचवा आरोपी शुभांगीच्या पतीचा मित्र संदीप काचगुंडे अद्याप फरार आहे. त्याच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या चार आरोपींना आज दुपारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. मात्र, भाजप पदाधिकारी संदीप काचगुंडे याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. सध्या पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.