Bengaluru Stampede : विराट कोहलीच्या अडचणी वाढणार? चिन्नास्वामी स्टेडियम चेंगराचेंगरी प्रकरणी तक्रार दाखल
esakal June 07, 2025 03:45 AM

बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी मिरवणुकीदरम्यान चेंगराचेंगरीची घटना घडली होती. या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला, तर 30 हून अधिक जण जखमी झाले. या प्रकरणी बंगळुरू पोलिसांकडून कारवाई सुरू असून, आता विराट कोहलीविरुद्धही गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी तक्रारही दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे विराट कोहलीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कब्बन पार्क पोलीस ठाण्यात विराट कोहलीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते एच.एम. वेंकटेश यांनी ही तक्रार दाखल केली असून, या तक्रारीची लवकरच दखल घेतली जाईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी RCB च्या मार्केटिंग आणि रेवेन्यू विभागाचे प्रमुख निखिल सोसले यांना अटक केली आहे. याशिवाय, इतर तीन कर्मचाऱ्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. निखिल सोसले यांनी पोलिसांच्या परवानगीशिवाय विधान सौधा ते चिन्नास्वामी स्टेडियमपर्यंत विजयी मिरवणुकीची घोषणा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

अशातच आता विराट कोहलीविरुद्धही तक्रार दाखल झाली आहे. त्यामुळे या प्रकरणी बंगळुरू पोलीस काय कारवाई करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तत्पूर्वी, RCB ने या प्रकरणी प्रतिक्रिया देत ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. तसेच, पीडितांना प्रत्येकी 10 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.

याशिवाय, या घटनेत जखमी झालेल्या चाहत्यांसाठी 'RCB Cares' नावाने निधी स्थापन करण्यात आला आहे. आमचे चाहते आमच्या कार्याचे केंद्रबिंदू आहेत आणि नेहमीच राहतील. या दुखाच्या काळात आपण एकत्र आहोत, असे RCB कडून सांगण्यात आले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.