Beed Crime : नवऱ्याच्या सतत च्या पैसे मागणीच्या जाचाला कंटाळून पत्नीने गळफास घेऊन जीवन संपविले
esakal June 07, 2025 05:45 AM

ईश्वर खामकर

किल्लेधारूर : अंबाजोगाई तालुक्यातील गिता येथील २६ वर्षीय विवाहितेने सासरच्यांच्या सततच्या पैश्याच्या मागणीला व शारीरिक छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (दि.०५) घडली आहे. शुभांगी संतोष शिंदे (रा. गीत्ता, ता. अंबाजोगाई) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असतानाच आणखीन अश्याच पैश्याच्या जाचाला कंटाळून शुभांगी ने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.मयत युवतीचा भाऊ प्रदीप रुस्तुम सोळुंके (रा. मोहखेड, ता. धारूर) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, शुभांगी हिचा विवाह २२ मे २०२२ रोजी संतोष विलास शिंदे (रा. गिता, ता. आंबाजोगाई) याच्याशी हिंदू धर्म पद्धती नुसार झाला होता. विवाहानंतर दीड वर्षांनी शुभांगीला एक मुलगा झाला. सुरुवातीला सासरच्यांनी शुभांगीला चांगली वागणूक दिली, मात्र नंतर तिच्यावर पैशासाठी दबाव आणला जाऊ लागला.

पती संतोष शिंदे आणि त्याचा मित्र धारूर भाजपा तालुका अध्यक्ष संदीप काचगुंडे यांच्यात भागीदारीत अंबाजोगाई आणि धारूर येथे दोन चष्म्याची दुकाने आहेत. शुभांगीच्या पतीसह सासरे विलास शिंदे, सासू सुमन शिंदे, नणंद सीमा शिंदे आणि संतोष शिंदेचा मित्र संदीप काचगुंडे यांनी तिला व तिच्या माहेरच्या मंडळींना सतत आर्थिक मागण्या करत त्रास दिला.कधी दुकान उघडण्यासाठी एक लाख, तर कधी मशीन घेण्यासाठी तीन लाखांची मागणी झाली. एकूण पाच लाख रुपये शुभांगीच्या माहेरच्यांनी वेगवेगळ्या टप्प्यांवर दिले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

पैसे देण्यास नकार दिल्यानंतर शुभांगीवर सासरच्यांनी शारीरिक व मानसिक अत्याचार वाढवले. सहा महिन्यांपूर्वी तिला माहेरी पाठवून पुन्हा चार लाखांची मागणी करण्यात आली. तिच्या माहेरच्या लोकांनी पुन्हा एकदा विनंती केल्यानंतर तिला सासरी नेण्यात आले, मात्र त्रास थांबला नाही.अखेर सततच्या छळास त्रासलेल्या शुभंगीनेगुरुवारी (दि.०५) सकाळी ११ वाजता राहत्या घरी पत्राच्या लोखंडी अँगलला स्कार्फने गळफास घेऊन आत्महत्या केली.

पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.या प्रकरणी संतोष शिंदे (पती), विलास शिंदे (सासरे), सुमन शिंदे (सासू), सीमा शिंदे (नणंद) आणि संदीप काचगुंडे (मित्र) यांच्याविरोधात बरदापुर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.