Accident News : बाभूळगावमध्ये टँकरच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
esakal June 07, 2025 06:45 AM

बाभूळगाव : भरधाव टँकरने मोपेड दुचाकीस्वारास जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना बाभूळगाव कळंब रोडवरील महल्ले सभागृहासमोर दि. 6 जुन रोजी सकाळी 8.30 वाजतााचे सुमारास घडली. यातील मृतकाचे नाव दमडुजी नारायण राऊत, वय 65 वर्षे, असून ते बाभूळगाव शहरातील आबाजी महाराज मंदिराजवळील रहिवासी आहेत.

प्राप्त माहिती नुसार दमडुजी राऊत हे पाणी पुरवठा योजनेच्या कामावर रोजमजुरी करतात. ते कामावर जाण्यासाठी हिरो प्लेझर मोपेड दुचाकी क्र. एम.एच.यु. 1908 या वाहनाचा वापर करतात. नेहमीप्रमाणे घर जवळ पडत असल्याने बाभूळगाव शहरात जाण्यासाठी असलेल्या महल्ले सभागृहासमोरील रस्त्याचा वापर करतात. दि. 6 जून रोजी सकाळी 8.30 वाजताचे सुमारास त्यांनी महल्ले सभागृहापासून सदर रस्त्याकडे वळन घेतले, दरम्यान बसस्थानकाकडून कळंब कडे जाणा-या टँकर क्र. जी.जे.12 सी.टी 9829च्या चालकाला सदर दुचाकी एकदम समोर आल्याचे जाणवल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले.

टँकर वाहनाचा वेग जास्त असल्याने सदर वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीसह दमडुजी राऊत फरफटत गेल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला. यावेळी टँकर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी प्रदीप दमडु राऊत याने बाभूळगाव पोलीस स्टेशनला फिर्याद नोंदविली. पुढील तपास बाभूळगाव पोलीस निरीक्षक लहुजी तावरे यांचे मार्गदर्शनात जमादार विजय लोखंडे, पोलीस नायक निलेश भुसे करीत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.