Chh. Sambhajinagar Crime : 'मैं एरियाका डॉन हूँ...' म्हणत वेटरवर चाकूहल्ला जुना मोंढा भागातील घटना, चौघांवर गुन्हा
esakal June 07, 2025 08:45 PM

छत्रपती संभाजीनगर : ‘मै इस एरियाका डॉन हूँ...’ असे म्हणत गुंडाने साथीदारांच्या मदतीने हॉटेलमधील वेटरवर चाकूने हल्ला केला. ता. ५ जूनला रात्री सव्वादहाला जुना मोंढ्यातील जनता हॉटेलमध्ये हा प्रकार घडला. याप्रकरणी चार आरोपींवर क्रांती चौक पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला.

याप्रकरणी शेख नाजीम शेख शेरू (वय ४१, रा. बायजीपुरा) यांनी तक्रार दाखल केली. शेख यांचे जुना मोंढा भागात जनता नावाने हॉटेल असून त्यांच्याकडे रसिक रज्जाक खान (वय १९, रा. बराईत, उत्तरप्रदेश) हा वेटर म्हणून कामाला आहे.

५ जूनला रात्री दहाला हॉटेलमध्ये मेहमूद याफई ऊर्फ चाऊस, फरू, सुलतान आणि त्यांच्यासोबत एक अनोळखी व्यक्ती आले. या चौघांनी जेवणाची ऑर्डर दिली. जेवण येण्याकरिता वेळ असल्याने शेख यांनी त्यांना टेबलापाशी बसण्यास सांगितले.

यावेळी आरोपी चाऊस हा टेबलावर न बसता थेट किचनच्या दरवाजाला दोन्ही हात लावून उभा राहिला. ‘जल्दी खाना दो...’ असे ओरडला. वेटर रसिकने त्याला तुम्ही टेबलवर जा, मी जेवण घेऊन येत आहे, असे सांगितले.

यावेळी चाऊसने रसिकला शिवीगाळ करीत ‘मुझे पहेचानता नही क्या? मै इस एरियाका डॉन हूँ...’ असे म्हणत मारहाण केली. यानंतर त्याच्या साथीदारांनी देखील वेटरला मारहाण केली. चाऊसने त्याचा चाकू रसिकच्या पोटात खुपसला. यात रसिक गंभीर जखमी झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी हॉटेलकडे धाव घेतली, मात्र तोपर्यंत आरोपी पसार झाले. याप्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. पीएसआय तनपुरे तपास करीत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.