नाशिक- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धार्मिक पर्यटन वाढविण्याच्या उद्देशाने नाशिकला रामकाल पथाची घोषणा केली आहे. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून १४६ कोटी रुपये प्राप्त होणार आहेत. रामकाल पथच्या पहिल्या टप्प्यातील कामांसाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत सवानी नामक एजन्सी पात्र ठरल्याने कमी दरामुळे त्याच कंपनीला कामे मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
रामकाल पथसाठी केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने ९९.१४ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य मंजूर केले. त्यातील ६५ कोटी रुपयांचा निधी पहिल्या टप्प्यात प्राप्त झाला आहे. राज्य शासनाने नव्याने ४७ कोटी रुपयांची तरतूद केल्याने १४६ कोटी रुपये प्राप्त होणार आहे. पंतप्रधान मोदींचा महत्वकांक्षी प्रकल्प असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसांच्या कालबद्ध कार्यक्रमात प्रकल्पाचा समावेश केला. त्यामुळे महापालिकेने तातडीने प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पावले उचलली.
रामकाल पथसाठी अहमदाबाद येथील मे. एच. सी. पी. डिझाईन प्लॅनिंग ॲन्ड मॅनेजमेंट कंपनीला आराखडा तयार करण्याचे काम देण्यात आले. आराखडा तयार केल्यानंतर निविदा प्रक्रिया राबविली. पहिल्या निविदा प्रक्रियेला एका निविदा धारकाचा प्रतिसाद मिळाला. बांधकाम विभागाने आठ दिवस मुदतीची फेरनिविदा प्रसिद्ध केली. त्यात तीन कंपन्यांनी सहभाग घेतला. आर्थिक देकार उघडल्यानंतर दोन एजन्सी पात्र ठरल्या. सवानी एजन्सीचे दर कमी आले.
असा आहे प्रकल्प
पहिला टप्प्यात २२ कोटी रुपये खर्च करून अहिल्यादेवी होळकर ते टाळकुटेश्वर पूल दरम्यान सुशोभीकरण केले जाणार आहे. सिता गुंफा ते श्री काळाराम मंदिर पुढे रामतीर्थपर्यंतचा परिसर विकसित केला जाणार आहे. अहिल्यादेवी होळकर पूल परिसर, गांधी तलाव, रामतीर्थ भागातील सौंदर्यीकरण, गांधी तलाव व रामतीर्थ परिसरात प्रभू श्रीरामाची धनुर्धारी भव्य प्रतिकृती, टाळकुटेश्वर पुलापर्यंत पुतळे, शिल्प, स्तंभ, विद्युत रोषणाई ही रामकाल पथची वैशिष्टे आहेत.
रामकाल पथासाठी आर्थिक देकार उघडले त्यात सवानी एजन्सीचे दर सर्वाधिक कमी आले.
-संजय अग्रवाल, शहर अभियंता, महापालिका