Sand Smuggling : आरटीओंचा वायूवेग, वाळूचे ३० हायवा टार्गेट; वाळूतस्करांना भरली धडकी, साडेतीन लाखांचा दंड, १४ वाहने जप्त
esakal June 08, 2025 03:45 PM

छत्रपती संभाजीनगर : वेगवान वाऱ्यासारखे येऊन धडाधड वाळूतस्करीतील ३० हायवा आरटीओंच्या वायूवेग पथकाने टार्गेट केले. या विशेष मोहिमेत विनारॉयल्टी आणि विनाक्रमांकाच्या हायवांकडून तब्बल तीन लाख ३८ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. त्यापैकी १४ वाहने जप्त केली आहेत.

जिल्हाभरात वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रकने धुमाकूळ घातला आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर विनारॉयल्टी आणि क्रमांकाच्या हायवा ट्रकच्या माध्यमाने अवैध वाळू वाहतूक केली जात आहे. दररोज रात्रीच्या वेळी जिल्ह्यातील सर्वच रस्त्यांवर प्रशासनाच्या डोळ्यात धुळफेक करून वाळू वाहतूक केली जाते. विशेष म्हणजे यातील बहुतांश वाळू वाहतूक करणारे हायवा ट्रक हे विनाक्रमांकाचे आहेत.

अनेक वाहनांवर क्रमांक खोडलेले दिसतात. अनेक वाहनांचे फिटनेस केलेले नाही. फिटनेस प्रमाणपत्राविना ही वाहने रस्त्यावरून पोलिस आणि पोलिसांना चकमा देऊन वाळू वाहतूक करत आहेत. त्यामुळेच अशा वाहनांविरोधात कारवाई करण्याचे आदेश प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी दिले होते.

आदेश येताच वायूवेग पथक धडकले वाळूपट्ट्यात

प्रादेशिक परिवहन कार्यालयातून आदेश येताच वायूवेग पथकाने जिल्ह्यातील पैठण, पाचोड, सावंगी, वाळूज, माळीवाडा, शरणापूर फाटा आणि धुळे-सोलापूर महामार्गावर तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेत विशेषतः अवैध गौणखनिज वाहतूक करणाऱ्या तसेच रस्त्यांवर विनापरवाना धावणाऱ्या हायवा, टिप्पर वाहनांना लक्ष्य करण्यात आले होते.

याशिवाय भार क्षमतेपेक्षा जास्त गौणखनिज वाहने, विनानोंदणी क्रमांक, विनाविमा, कालबाह्य फिटनेस प्रमाणपत्र, विनारिफ्लेक्टर व चमकदार लाइट्स वापरणारी वाहने अशा तब्बल ३० वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. १४ वाहने जप्त करण्यात आली आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.