भंडारा: अकोला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तीन दिवसांपूर्वीच आमदारांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. भाजपचे आमदार रणधीर सावरकर आणि अकोला जिल्ह्यातील बाळापुरचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख एकमेकांवर धावून गेले होते. दोघांकडून एकमेकांना प्रचंड अश्लील शिवीगाळ देखील करण्यात आली. भर बैठकीतच राडा झाल्यानं घटनेचे व्हिडिओही समोर आले. आता, भंडारा (Bhandara) जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही सत्ताधारी व विरोधी आमदारांमध्ये (MLA) जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे, यावेळी, खासदार प्रशांत पडोळे यांच्या सोशल मिडिया हँडलरचा मोबाईल काढून घेण्यात आल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. सध्या जिल्ह्यात या राड्याची जोरदार चर्चा आहे.
भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनमध्ये डीपीसी म्हणजे जिल्हा नियोजन समितीच बैठक सुरू असताना निधी वाटपावरून सत्ताधारी आमदार आणि विरोधी आमदार व खासदार एकमेकांसमोर भिडले. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर संजय सावकारे यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या बैठकीत काँग्रेसचे आमदार नाना पटोले, विधानपरिषद सदस्य अभिजीत वंजारी, खासदार प्रशांत पडोळे, भाजप आमदार परिणय फुके, शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर, राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष कविता उईक हे उपस्थित होते. यावेळी निधी वाटपावरून काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांनी निधी वाटपात दुजाभाव होत असल्याचा आरोप केला. त्यावरून भाजपचे आमदार परिणय फुके, शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर आणि काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांच्यात वाद उत्पन्न झाला.
काँग्रेस आमदार-खासदार आणि सत्ताधारी आमदार एकमेकांसमोर उभे ठाकले आणि सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींमध्ये ताणाताणी पाहायाला मिळाली. त्यानंतर बैठक नाना पटोले वगळता सर्व लोकप्रतिनिधींसोबत पालकमंत्री सावकारे यांनी नियोजन भवनमध्ये बंद दाराआड चर्चा केली. दरम्यान, या सभेचं व्हिडिओ चित्रीकरण करणाऱ्या खासदार प्रशांत पडोळे यांच्या सोशल मीडिया हँडलरचा मोबाईल तेथील अधिकाऱ्यांनी हिसकावून घेत त्याला बैठकीतून बाहेर काढलं. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे. याबाबत पालकमंत्री संजय सावकारी यांनी असा कुठलाही प्रकार घडला नसल्याचं सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.
बेकायदेशीर रजिस्ट्री, जिल्हाधिकारी कर्डिलेंचा दणका; नांदेडमध्ये दुय्यम निबंधक तत्काळ निलंबित
आणखी वाचा