अक्षय बडवे, साम टीव्ही
उसने पैसे देण्याच्या वादातून एका रिक्षाचालकाने महिलेचा गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही धक्कादायक घटना पुण्यातील सिंहरोड परिसरात घडली आहे. या प्रकरणाची माहिती त्याने आपल्या भावाला दिली. त्यानंतर तो गुरुवारी रात्री नांदेडसिटी पोलीस ठाण्यात हजर झाला. तसेच आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
हा रिक्षा चालक असून, श्यामली कमलेश सरकार असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. श्यामली सरकार आणि नितीन पंडित यांची ओळख रिक्षातून प्रवासाच्या दरम्यान झाली होती. नितीन दररोज तिला सायंकाळी बुधवार पेठेत सोडत असे. याच ओळखीच्या आधारे श्यामलीने नितीनकडून ५० हजार रुपये उसने घेतले होते.
पंडितने पैसे परत मागितले असता तिने पैसे परत देण्यासाठी टाळाटाळ केली आणि यातून त्यांच्यात वाद झाला. बुधवारी (४ जून) दुपारी नितीन पंडित श्यामलीला घेण्यासाठी धायरी येथील तिच्या घरी गेला. तिथे त्यांच्यात पुन्हा पैशांवरून वाद झाला. वाद विकोपाला गेला, आणि नितीनने श्यामलीची हत्या करण्याचं ठरवलं.
रागाच्या भरात श्यामलीच्या ओढणीने तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याने घराबाहेरून कुलूप लावले आणि स्वतः घरातच लपून बसला. यामुळे कुणालाही या घटनेची माहिती समजली नाही. घटनेनंतर तो दिवसभर घरातच होता. अखेरीस त्याने ही संपूर्ण घटना आपल्या भावाला सांगितली. त्यानंतर गुरुवारी रात्री तो नांदेड सिटी पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला. पोलिसांनी त्याला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.