स्वस्त कांद्याच्या प्रलोभनावर १० लाखांची फसवणूक
esakal June 08, 2025 09:45 PM

स्वस्त कांद्याच्या प्रलोभनावर १० लाखांची फसवणूक
मुंबई, ता. ८ ः स्वस्तात कांदे मिळवून देतो, असे आमिष दाखवणाऱ्या जुन्या ग्राहकाने भाईंदर येथे घाऊक भाजीविक्री करणाऱ्या व्यावसायिकाला तब्बल १० लाख रुपयांना फसवले. या ग्राहकाने व्यावसायिकाच्या हातातील १० लाख रुपये असलेली बॅग हिसकावून पळ काढला. मंगळवारी (ता. ३) दुपारी जोगेश्वरी येथील पश्चिम द्रुतगती मार्गावर ही घटना घडली.
माजीद हुसेन असे या भाजीविक्रेत्याचे नाव आहे. कोरोनापूर्व काळात आरोपी राजू वरचेवर माजीदकडून घाऊक भाजी विकत घेत असे. या व्यवहारांमुळे दोघांचा परिचय वाढला. गेल्या महिन्यात राजू माजीदकडे आला. सध्या कांदे स्वस्त झाले आहेत. भविष्यात कांदा महाग होणार असल्याने जास्त फायदा हवा असेल तर आत्ताच ५० टन कांदा विकत घे, मी तुला स्वस्तात कांदा उपलब्ध करून देईन, असे सांगितले. माजीदलाही ते पटले. त्याने १० लाख रुपयांची जुळवाजुळव करून राजूला संपर्क साधला.
कांदे खरेदी व्यवहाराच्या निमित्ताने राजूने माजीदला जोगेश्वरी येथे आणले. तिथे पैसे असलेली बॅग नीट पकड, अशी काळजी व्यक्त करणाऱ्या राजूने ती आपल्याकडे घेतली. थोड्याच वेळात तेथे आलेल्या रिक्षात बसून राजू निघून गेला. काही कळण्याच्या आत हा प्रकार घडल्याचे माजीदने पोलिसांना सांगितले. त्याच्या तक्रारीआधारे जोगेश्वरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.