सामाजिक न्याय विभागाच्या पुरस्काराचे १० जून रोजी मुंबईत वितरण
esakal June 08, 2025 09:45 PM

सामाजिक न्याय विभागाच्या पुरस्काराचे १० जून रोजी मुंबईत वितरण
मुंबई, ता. ८ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, राज्यातील एकूण १३० पुरस्कारार्थ्यांची निवड या पुरस्काराकरिता करण्यात आलेली आहे. त्यामध्ये ९० व्यक्ती व ४० संस्थांचा समावेश आहे. या पुरस्कारांचे वितरण १० जून रोजी सकाळी १० वाजता मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ तसेच अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
२०२३-२४ या आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार, कर्मवीर पद्मश्री दादासाहेब भाऊराव कृष्णराव गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहु, फुले, आंबेडकर पारितोषिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्रावीण्य पुरस्कार या विविध पुरस्कारांची शासनाने घोषणा केली आहे.
जाहीर करण्यात आलेल्या पुरस्कारप्राप्त व्यक्ती व संस्था याची माहिती पुढीलप्रमाणे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार ६१ व्यक्ती -(प्रत्येकी ७५ हजार) व १० संस्था ( प्रतिसंस्था प्रत्येकी एक लाख), साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार २७ व्यक्ती (प्रत्येकी ७५ हजार) व सहा संस्था (प्रतिसंस्था प्रत्येकी एक लाख), कर्मवीर पद्मश्री दादासाहेब भाऊराव कृष्णराव गायकवाड पुरस्कार एख व्यक्ती -(प्रत्येकी ५१ हजार) व एख संस्था (प्रतिसंस्था प्रत्येकी एक लाख), संत रविदास पुरस्कार एख व्यक्ती-(प्रत्येकी ५१ हजार) व एख संस्था (प्रतिसंस्था प्रत्येकी एख लाख), शाहु, फुले, आंबेडकर पारितोषिक एकूण १४ संस्थांना सहा महसुली विभागानुसार प्रत्येकी दोन संस्था ७.५० लाख सन्मानपत्र, मानपत्रासाठी चांदीचा स्क्रोल, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्रावीण्य पुरस्कार आठ संस्थांना देण्यात येणार असून, प्रथम पुरस्कार पाच लाख, द्वितीय पुरस्कार तीन लाख व तृतीय पुरस्कार दोन लाख आणि विभागीय स्तरावर पाच पुरस्कार देण्यात येतील. प्रत्येकी एक लाख याप्रमाणे राज्यातील ९० व्यक्ती व ४० संस्था अशा एकूण १३० पुरस्कारार्थ्यांची निवड या विविध पुरस्कारांसाठी करण्यात आलेली आहे.
या सर्व पुरस्कार वितरण सोहळयाचे नियोजन काटेकोर पद्धतीने होण्यासाठी विभागाचे प्रधान सचिव हर्षदिप कांबळे, समाज कल्याण विभागाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी विविध बैठका घेऊन अधिकाऱ्यांना निर्देशित केले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.