गगनचुंबी व्यवसायिक इमारतीला महिनाभरात मिळणार पर्यावरण विभागाची परवानगी
esakal June 08, 2025 09:45 PM

गगनचुंबी व्यावसायिक इमारतीला महिनाभरात मिळणार पर्यावरण विभागाची परवानगी
वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प; काम सुरू करण्याबाबत म्हाडाचा आराखडा तयार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत वरळीत तब्बल ८२ मजल्यांचे चार गगनचुंबी टॉवर होणार आहेत. त्यासाठी आवश्यक असलेली पर्यावरण विभागाची परवानगी महिनाभरात मिळणे अपेक्षित आहे. ही परवानगी येताच संबंधित व्यावसायिक इमारतीच्या कामाला सुरुवात होणार असून, त्याबाबत म्हाडाने आराखडा तयार केला आहे. या इमारतीत विक्रीयोग्य निवासी आणि व्यावसायिक गाळे काढले जाणार आहेत.
वरळी बीडीडी येथे १२१ चाळी असून, त्यामध्ये ९,६८९ सदनिका आहेत. त्या जागेवर ४२ मजली ३३ इमारती उभ्या राहणार असून, त्यापैकी दोन इमारतींचे काम पूर्ण झाले असून, लवकरच ५५६ रहिवाशांना घरांचा ताबा दिला जाणार आहे. तसेच इतरही इमारतीची कामे वेगाने सुरू आहेत. दरम्यान, उर्वरित जागेवर म्हाडाकडून विक्रीयोग्य निवासी व व्यावसायिक इमारती उभारून बीडीडी चाळ पुनर्विकासासाठी निधी उभा करण्याचे म्हाडाचे नियोजन आहे. त्यानुसार चाळ क्रमांक १८, १९ आणि २० च्या जागेवर सुरुवातीला पार्किंग, पोडियमसह सुमारे ७८ मजली इमारती उभारण्याचे नियोजन होते, मात्र म्हाडा नव्या आराखड्यानुसार इमारतीची उंची ८२ मजल्यापर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे पर्यावरण विभागाच्या परवानगीला विलंब होत असून, ती पुढील महिनाभरात येण्याची शक्यता आहे. ती आल्यानंतर तत्काळ कामाला सुरुवात केली जाईल, असे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.