डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, आता ‘या’ १२ देशातील नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी
GH News June 08, 2025 11:05 PM

डोनाल्ड ट्रम्प हे दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यापासून त्यांना कठोर निर्णयांचा धडाका लावला आहे. आता परदेशी दहशतवाद्यांपासून देशाच्या सुरक्षेचा हवाला देत, ट्रम्प सरकारने १२ देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेशाबंदी केली आहे. ट्रम्प यांचा हा निर्णय स्थलांतर विरोधी धोरणाचा एक भाग मानले जात आहे.

या १२ देशातील नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी

डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर आता १२ देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करता येणार नाही. यात अफगाणिस्तान, म्यानमार, चाड, काँगो, इक्वेटोरियल गिनी, एरिट्रिया, हैती, इराण, लिबिया, सोमालिया, सुदान आणि येमेन या देशांचा समावेश आहे.

‘या’ सात देशांवरही अंशतः बंदी

वरील १२ देशांसिवा आणखी सात देशांवरही अंशतः बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये बुरुंडी, क्युबा, लाओस, सिएरा लिओन, टोगो, तुर्कमेनिस्तान आणि व्हेनेझुएला या देशांचा समावेश आहे. या देशांच्या नागरिकांना काही प्रकरणांमध्ये अमेरिकेत प्रवेश दिला जाणार नाही. ट्रम्प यांच्या मते या देशांमधील नागरिकांमध्ये दहशतवाद्यांचे प्रमाण जास्त आहे त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

ट्रम्प यांनी नेमकं काय म्हटले?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या बंदीबाबत म्हटले की, ‘ही बंदी घालणे आवश्यक आहे कारण काही देश व्हिसा सुरक्षेत सहकार्य करत नाहीत, त्यांच्याकडे प्रवाशांचे योग्य रेकॉर्ड नाहीत आणि अनेक वेळा लोक अमेरिकेत येतात आणि निर्धारित वेळेपेक्षा जास्त काळ राहतात.’ दरम्यान ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळातही सात मुस्लिम बहुल देशांवर बंदी घातली होती.

अनेक देशांमध्ये संतापाची लाट

अमेरिकन सरकारच्या या निर्णयावर अनेक देशांनी नाराजी व्यक्त केली आहे. चाडच्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकन नागरिकांना व्हिसा देणे बंद करण्याची घोषणा केली आहे. तसेच अमेरिकेतही या निर्णयावर टीका होत आहे. खासदार रो खन्ना यांनी याला असंवैधानिक म्हटले आहे. तर दुसरीकडे ट्रम्प समर्थकांनी, ‘हा निर्णय अमेरिकेच्या सुरक्षेसाठी आवश्यक आहे’ असं म्हटलं आहे. आता आगामी काळात अमेरिका हा निर्णय मागे घेणार की बंदी कायम ठेवणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.