राजाचा मृत्यू, सोनम अद्यापही बेपत्ता... हनीमूनसाठी मेघालयात गेलेल्या दाम्पत्याबरोबर काय घडलं? ३ जणांच्या एंट्रीने वाढला सस्पेंस
esakal June 09, 2025 12:45 AM

Raj-Sonam honeymoon turns into tragedy as husband found dead in Meghalaya : इंदौरहून हनीमूनसाठी मेघालयात गेलेल्या दाम्पत्याच्या रहस्यमय प्रकरणाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. या घटनेचे विविध पैलू दररोज समोर येत आहेत, यापैकी राजाचा मृत्यू झाला असून सोनम अद्याप बेपत्ता आहे. अशातच आता या प्रकरणात तीन अनोळखी व्यक्तींची एंट्री झाली झाली आहे.

स्थानिक टूरिस्ट गाइड अल्बर्ट पी. डी. याच्या दाव्याने आता सस्पेंस वाढला आहे. त्याने २३ मे २०२५ रोजी राजा आणि सोनम यांना तीन अनोळखी पुरुषांसह ट्रेकिंग करताना पाहिल्याचे सांगितले. त्यामुळे हे तिघे कोण होते, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

अल्बर्ट याने पोलिसांना सांगितले की, दोघे बेपत्ता होण्याच्या एक दिवस आधी त्याने त्यांना तीन पुरुषांसह पाहिले होते. त्यावेळी चार पुरुष पुढे चालत होते, तर सोनम मागे होती. ते हिंदीत बोलत होते, पण गाइडला फक्त खासी आणि इंग्रजी समजत असल्याने त्यांचे संभाषण त्याला कळले नाही.

पोलिसांनी गाइडचा जबाब नोंदवला असून, या माहितीच्या आधारे तपास सुरू केला आहे. राजाचा मृतदेह सापडला तेव्हा त्याच्याकडील सोन्याची अंगठी आणि साखळी गायब होती, ज्यामुळे लूटपाट आणि खुनाची शक्यता व्यक्त केली जात आहे.

याशिवाय, पोलिसांना रक्ताने माखलेली माचेटी आणि मॉकमा गावातून काळा रेनकोट सापडला आहे, जो सीसीटीव्ही फुटेजनुसार सोनमने घातला होता. तसेच, दोघांनी भाड्याने घेतलेली स्कूटीही पोलिसांनी जप्त केली आहे.

सोनमचा भाऊ गोविंद रघुवंशी सध्या शिलॉन्गमध्ये असून, त्याने स्थानिक प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. प्रशासन सोनमला मृत समजून शोध घेत असल्याचे त्याचे म्हणणे आहे. त्याने सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी पूर्ण ताकदीने शोधमोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.