Satara Accident:दुर्दैवी घटना! 'नागठाणेत अपघातात बाप-लेकीचा मृत्यू'; टेंपोची दुचाकीला धडक; दप्तर अन् पुस्तके विस्कटली
esakal June 09, 2025 01:45 PM

काशीळ : नागठाणे (ता. सातारा) येथील राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोल पंपासमोर टेंपोच्या धडकेत दुचाकीवरील बाप-लेकीचा मृत्यू झाला. इब्राहिम हसन शेख (वय ३८) व महेक इब्राहिम शेख (वय १२, सध्या रा. नागठाणे ता. सातारा. मूळा रा. जवुळके खुर्द, रेटवडी, पुणे) अशी त्यांची नावे आहेत.

आज दुपारी साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला. इब्राहिम शेख हे आज दुपारी मुलगी महेकला घेऊन दुचाकी (एमएच १४ एफक्यू २७६३) वरून काशीळहून नागठाणेकडे निघाले होते. यावेळी मागून आलेल्या टेंपोने (एमएच १२ जीटी ९०८९) दुचाकीला जोरदार धडक दिली. यात इब्राहिम शेख व त्यांची मुलगी महेक खाली पडून गंभीर जखमी झाले. यावेळी दुचाकी टेंपोमध्ये अडकून सुमारे ५०० मीटर फरफटत गेली.

या अपघातातील जखमी बाप-लेकीला उपचारासाठी साताऱ्यातील जिल्हा रुग्णालयात नेत असतानाच वाटेत त्या दोघांचाही मृत्यू झाला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच बोरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी टेंपो चालक आसिफ नैमुद्दीन सय्यद (रा. मोहम्मदवाडी रोड, सय्यदनगर हडपसर, पुणे) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिस ठाण्यात सुरू होती.

अपघातस्थळी नवे दप्तर, विस्कटलेली पुस्तके

महेक बकरी ईदसाठी आजोळी काशीळला आली होती. इब्राहिम हे महेकला नागठाणे येथे सोडण्यासाठी निघाले होते. महेकला शाळेसाठी खरेदी केलेले नवीन दप्तर तसेच पुस्तके अपघातस्थळी विस्कटलेले होते. या अपघाताने काशीळ येथे शोककळा पसरली होती.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.