Ambad Accident : दुचाकींच्या अपघातात एक ठार, दोघे गंभीर; अंबड-पाचोड मार्गावरील चिंचखेड फाट्याजवळील घटना
esakal June 09, 2025 01:45 PM

अंबड : अंबड-पाचोड मार्गावरील चिंचखेड फाट्याजवळ शनिवारी (ता. सात) दुपारी साडेचारच्या सुमारास झालेल्या दुचाकींच्या अपघातात एक ठार, तर दोघे गंभीर जखमी झाले.

तालुक्यातील ताडहादगाव येथील शरद वाघुंडे व राजेंद्र जाधव हे दुचाकी (एमएच-२१, एए ६१३३) ने पैठण येथे दर्शनासाठी गेले होते. दुपारी ते देवदर्शन करून गावाकडे परतत असताना चिंचखेड फाट्यालगत करडगाव येथील जय खुशाल तावरे (वय २५) याच्या दुचाकी (एमएच-२१, बीजी-४२२१) सोबत त्यांची समोरासमोर धडक झाली.

यात ताडहादगाव येथील शरद निवृत्ती वाघुंडे (वय ४०) जागीच ठार झाला, तर त्याचा मित्र राजेंद्र अर्जुन जाधव व करडगाव येथील तरुण जय तावरे याच्या डोक्याला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

शरद वाघुंडे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. शनिवारी सायंकाळी शोकाकूल वातावरणात ताडहादगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ व भावजय असा परिवार आहे. अंबड पोलिस ठाण्यात अस्कमात मृत्यूची नोंद करण्यात आली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.