Shooting World Cup : ऑलिंपिकमध्ये पदक पटकाविणाऱ्या स्वप्नीलवर मदार; नेमबाजी विश्वकरंडक, महिला खेळाडू इलावेनिलचे पुनरागमन
esakal June 09, 2025 02:45 PM

म्युनिच : नेमबाजी विश्वकरंडकाला येत्या मंगळवारपासून म्युनिच येथे सुरुवात होणार आहे. पॅरिस ऑलिंपिकमध्ये ब्राँझपदक पटकावलेल्या स्वप्नील कुसाळे याच्याकडून भारताला पदक पटकावण्याची आशा आहे.

तसेच महिला विभागात इलावेनिल वालारिवन हिचेही पुनरागमन झाले आहे. स्वप्नील कुसाळे याने पॅरिस ऑलिंपिकमध्ये पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन या प्रकारात ब्राँझपदक पटकावत देशाचा झेंडा दिमाखात फडकवला.

गेल्या काही काळात स्थानिक स्पर्धांमध्येही त्याने चमक दाखवली. स्वप्नील याची भारतीय संघात निवड झाली असून, आता त्याच्याकडून प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये पदक पटकावण्याची अपेक्षा केली जात आहे. दोन वेळा ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी इलावेनिल वालारिवन ही पॅरिसनंतर थेट आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे.

म्युनिचमधील विश्वकरंडकासाठी भारतीय संघामध्ये नव्या चेहऱ्यांनाही संधी देण्यात आली आहे. राष्ट्रीय विजेती अनन्या नायडू हिच्यासह आदित्य मालरा व निशांत रावत या युवा खेळाडूंना भारतीय संघात संधी देण्यात आली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील विजेती पलक ही महिलांच्या एअर पिस्तोल प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

६९५ खेळाडूंचा सहभाग

म्युनिच येथील नेमबाजी विश्वकरंडकात ७८ देशांतील ६९५ खेळाडूंचा सहभाग असणार आहे. यजमान जर्मनी या देशातील २७ नेमबाज या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. माजी ऑलिंपिक व विश्वविजेता ख्रिस्तीयन रेईट्झ याच्यावर जर्मनी संघाची मदार असणार आहे. जागतिक विक्रम नावावर असलेली ॲना जानसेन हीदेखील जर्मनी देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे. जर्मनीप्रमाणे कोरिया संघातून अव्वल दर्जाचे खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. १९ नेमबाज कोरिया देशाकडून म्युनिच येथील मानाच्या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत.

८ ते १५ जूनमध्ये स्पर्धा

जर्मनीतील म्युनिच येथे ८ ते १५ जून या कालावधीत नेमबाजी विश्वकरंडक ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. ८ जूनपासून खेळाडूंच्या आगमनाला सुरुवात होईल. ९ जून रोजी सराव करण्यात येईल. १० जूनपासून मुख्य स्पर्धेला सुरुवात होणार आहे. १४ जूनला मुख्य स्पर्धेचा शेवटचा दिवस असणार आहे. १५ जूनला खेळाडू आपआपल्या देशाकडे रवाना होतील.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.