मैदान वाचवण्यासाठी शिरवणे ग्रामस्थांचा एल्गार
esakal June 09, 2025 10:45 PM

तुर्भे, ता. ९ (बातमीदार) : जुईनगर आणि शिरवणे ग्रामस्थांसाठी वापरात असलेलेल्या खेळाच्या मैदानावरील माती काढण्याची निविदा महापालिकेने काढली आहे. यामुळे दोन्ही ग्रामस्थांचे खेळाचे मैदान हातातून जाणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. हे मैदान वाचवण्यासाठी ग्रामस्थ एकवटले असून, याविरोधात त्यांनी स्वाक्षरी मोहीम राबवली आहे. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी सर्व ग्रामस्थ बुधवारी (ता. ११) महापालिका मुख्यालयावर धडक देणार आहेत. याबाबत रविवारी ग्रामस्थांनी बैठक आयोजित केली होती.
जुईनगर सेक्टर २१ येथे असलेल्या भूखंडावर आतापर्यंत मैदानाचे आरक्षण होते. त्यानुसार येथील नागरिक खेळासाठी, व्यायामासाठी या मैदानाचा वापर करत आले आहेत; मात्र मुंबई उच्च न्यायालयात २०२४ला दाखल झालेल्या जनहित याचिकेचा दाखला घेत, या ठिकाणची माती काढण्यासाठी निविदा मागवण्यात आली होती. या मैदानावर असलेले आरक्षण लक्षात आणून दिल्यावर ही निविदा थांबवण्यात आली होती. विशेष म्हणजे, शहर विकास आराखडा मंजुरीसाठी गेलेला असताना आणि त्यावर कोणताही निर्णय आलेला नसताना, या भूखंडाचे आरक्षण बदलण्यात आले. आता पुन्हा या भूखंडावर माती काढण्याचे काम सुरू होत आहे. केवळ कंत्राटदाराचा फायदा करून देण्यासाठी महापालिका अधिकारी हे काम करत आहेत. यामुळे आमच्या गावाच्या मैदानाचा नाहक बळी जात आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
----------------
मुख्यमंत्री, आयुक्तांना सह्यांचे पत्र
मैदान वाचवण्यासाठी ग्रामस्थांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ५००हून अधिक नागरिकांच्या सह्यांचे पत्र शिरवणे-जुईनगर मैदान बचाव समितीच्या माध्यमातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नगरविकास विभाग, महापालिका आयुक्त यांना देण्यात आले आहे. शिवाय मैदान वाचवण्यासाठी बुधवारी जनआंदोलन करण्याचा निर्णय मैदान बचाव समितीने घेतला असून, महापालिका मुख्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे, अशी माहिती नवी मुंबई भाजप जिल्हा अध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांनी दिली.
----------------
मैदान बचाव आंदोलन हे कोणा पक्षाचे किंवा व्यक्तिगत नाही. या आंदोलनाचे नेतृत्व हे सर्व खेळाडू संघटनांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. आज जर मैदाने वाचवली नाहीत, तर भविष्यात खेळासाठी जागाच उपलब्ध होणार नाही. मीदेखील एक खेळाडू म्हणून या आंदोलनात उतरणार आहे.
- डॉ. राजेश पाटील, नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष, भाजप
------------------
प्रत्येक गावाला मैदान देण्यास सिडको व महापालिका अपयशी ठरलेली आहे. गेली अनेक वर्षे आम्ही हे प्रस्तावित मैदान खेळण्यासाठी वापरत आहोत. त्यामुळे आम्ही अखेरपर्यंत सर्व पातळीवर लढा देऊ. मैदानावरचे आमचे असलेले हक्क अजिबात सोडणार नाही.
- श्रीकांत भोईर, ग्रामस्थ

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.