Pune Crime : एटीएममध्ये छेडछाड करून पैसे चोरणाऱ्या दोघांना अटक
esakal June 10, 2025 05:45 AM

पुणे - एटीएम मशिनमध्ये छेडछाड करून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणाऱ्या उत्तर प्रदेशातील दोन चोरट्यांना समर्थ पोलिसांनी अटक केली. रास्ता पेठेतील एका बँकेच्या एटीएममध्ये घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपींनी अशाच प्रकारे वारजे परिसरातही फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.

संतोषकुमार किशोरीलाल सरोज (वय २८) आणि प्रदीपकुमार नंदकिशोर मौर्या (वय २६, दोघे रा. जिल्हा प्रतापगढ, उत्तर प्रदेश) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी एका ज्येष्ठ नागरिकाने समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश गित्ते यांनी दिलेल्या माहितीनुसार, रास्ता पेठेतील बँकेच्या एटीएममधून पैसे काढत असताना एका ज्येष्ठ नागरिकाला चोरट्यांनी तांत्रिक अडचण असल्याचे भासवले. त्यानंतर चोरट्यांनी ज्येष्ठाच्या खात्यातून पैसे लांबवले होते. घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील एटीएममध्ये सापळा रचून सरोज आणि मौर्या यांना अटक केली.

चौकशी दरम्यान, आरोपींनी यापूर्वी वारजे परिसरातही एटीएममध्ये फसवणूक केल्याचे सांगितले. आरोपींच्या ताब्यातून चार एटीएम कार्ड आणि रोकड जप्त केली आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्त राजेश बनसोडे, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, सहाय्यक आयुक्त अनुजा देशमाने यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ निरीक्षक उमेश गित्ते, पोलिस निरीक्षक (गुन्हे) चेतन मोरे, उपनिरीक्षक जालिंदर फडतरे, संतोष पागार, रोहिदास वाघेरे, इम्रान शेख, शिवा कांबळे, अमोल गावडे, शरद घोरपडे आणि भाग्येश यादव यांनी ही कारवाई केली.

कॅश शटरजवळ लोखंडी पट्टी लावून चोरी-

आरोपी एटीएम मशीनमधून पैसे बाहेर येणाऱ्या भागात (कॅश शटरजवळ) लोखंडी पट्टी लावत असत. ज्येष्ठ नागरिक पैसे काढण्यासाठी आल्यानंतर लोखंडी पट्टीमुळे मशीनमध्ये पैसे अडकत असत. पैसे न मिळाल्याने ज्येष्ठ नागरिक एटीएममधून बाहेर गेल्यानंतर हे दोघे चोरटे पट्टी हटवून पैसे लंपास करीत होते. हे दोघे सहा जून रोजी एका बॅंकेच्या एटीएम मशिनमध्ये स्क्रू ड्रॉवरने छेडछाड करताना दिसून आले. त्यावेळी पोलिसांना आरोपींना ताब्यात घेतले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.