Pune Crime News : शिरूर मधे बेकायदा गुटखा व पान मसाल्याचा सव्वा लाखाचा साठा जप्त; शिरूर पोलिसांची धाडसी कारवाई
esakal June 10, 2025 06:45 AM

शिरूर : शिरूर गावाबाहेरून जाणाऱ्या (बायपास) पुणे - अहिल्यानगर रस्त्यालगत आडबाजूच्या एका खोलीवर छापा टाकून पोलिसांनी सुमारे सव्वा लाख रूपये किंमतीचा बेकायदा गुटखा व पान मसाला आणि तंबाखूचा साठा जप्त केला. शिरूर पोलिसांच्या या धाडसी कारवाईने शिरूर शहरातील गुटख्याच्या गोरखधंद्यावर प्रकाशझोत पडला आहे.

शहरालगत बायपासवर एका खोलीमध्ये गुटख्याचा मोठा साठा केलेला असून, तेथून या गुटख्याची बेकायदा विक्री केली जात असल्याची माहिती समजताच शिरूरचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे व उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्यासह शरद गावडे, नीरज पिसाळ, सचिन भोई, स्नेहल होळकर या पोलिस पथकाने बायपास लगत असलेल्या जिओ पेट्रोलपंपामागील आदित्य स्नॅक्स सेंटरजवळील घटनास्थळ शोधून छापा टाकला. काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घातलेल्या या छाप्यावेळी पोलिसांना एका खोलीत पांढऱ्या गोण्यांमध्ये हिरा, विमल, गोवा व डायरेक्टर स्पेशल पान मसाला आणि रॉयल, व्हीएन, शॉट ९९९, रॉयल ७१७ या टोबॅकोची पाकीटे भरून ठेवलेली आढळून आली. हा माल पोलिसांनी जप्त केला.

पोलिसांनी घटनास्थळाचा व जप्त गुटखा व पानमसाल्याचा पंचनामा केला असता १८ हजार चारशे रूपये किंमतीची हिरा पान मसाल्याची १०५ पाकिटे, ७५ हजार रूपये किंमतीची विमल पान मसाल्याची ३१६ पाकिटे, साडेपाच हजार रूपये किंमतीची गोवा पान मसाल्याची २७ पाकिटे, साडेचार हजार रूपये किंमतीची रॉयल टोबॅकोची शंभर पाकिटे, पाच हजार रूपयांची हि वन टोबॅकोची २२० पाकिटे, सात हजाराची डायरेक्टर स्पेशल पान मसाल्याची २८ पाकिटे, साडेतीन हजारांची शॉट ९९९ या कंपनीची टोबॅकोची २८ पाकिटे आढळून आली.

गुटख्याचा हा बेकायदा साठा करणारा हिमांशू धर्मवीर सिंग (वय २३, रा. शिरूर बायपास, शिरूर) याला ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्यानेच हा बेकायदा साठा केला असल्याची कबूली दिली. महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला पान मसाला व गुटख्याचा बेकायदा साठा केल्याप्रकरणी त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक केली. अधिक तपासातून सिंग याने हा बेकायदा गुटख्याचा माल अनिकेत सोनवणे (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) याच्याकडून विक्रीसाठी आणला असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली असून, त्यादृष्टीने पोलिस अधिक तपास करीत आहेत. जप्त केलेला बेकायदा गुटख्याचा साठा संबंधित खोलीतच सील केला असून खोलीलाही पोलिसांनी टाळे ठोकले.

रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या पथकानेही काल रात्री उशिरा कारेगाव (ता. शिरूर) येथील कारेश्वर जनरल स्टोअर्स व बालाजी पान शॉप वर छापा टाकून साडेपाच हजार रूपये किंमतीचा बेकायदा गुटखा जप्त केला. या प्रकरणी महेश मच्छिंद्र जाधव व राकेश राजू गुप्ता (दोघे रा. बाभुळसर रोड, कारेगाव) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार अण्णासाहेब कोळेकर, पंडीत मुंडे, ब्रह्मानंद पोवार, विलास आंबेकर या पथकाने ही कारवाई केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.