पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी दीर सुशील हगवणे याने बनावट कागदपत्रांच्या आधारे पुणे पोलिसांकडून शस्त्र परवाना मिळवल्याचे वास्तव उघडकीस आले आहे. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करत सोमवारी (ता. ९) त्याला ताब्यात घेतले.
वैष्णवीचा पती शशांक आणि दीर सुशील हे मुळशी तालुक्यातील भुकूम येथे वास्तव्यास आहेत. सुशील, शशांक हगवणे आणि त्यांचा निकटवर्तीय नीलेश चव्हाण यांनी २०२२ मध्ये शस्त्र परवाना मिळवण्यासाठी पुणे शहर पोलिसांकडे अर्ज केला होता. परंतु चौकशीत त्यांनी वास्तव्याचा खोटा पुरावा देत बनावट भाडेकरार सादर केल्याचे उघडकीस आले. त्यांनी कोथरूड आणि वारजे पोलिस ठाण्यांत सदनिकेचा बनावट पत्ता दाखवून शस्त्र परवाना मिळवला होता. याप्रकरणी वारजे आणि कोथरूड पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत.
इतर आरोपींचाही ताबा घेणारवैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात पोलिस कोठडीत असलेल्या सुशीलला आता फसवणुकीच्या नव्या गुन्ह्यात कोथरूड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शशांक हगवणे आणि नीलेश चव्हाण यांनाही मंगळवारी (ता. १०) ताब्यात घेतले जाणार असल्याची माहिती परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणवैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. वैष्णवीने लग्नानंतर सतत होणाऱ्या छळामुळे आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला होता. या प्रकरणात पती शशांक, दीर सुशील आणि इतरांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, ते सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.