Maharashtra Political Live Updates : बच्चू कडू यांच्या अन्नत्यागाचा आज तिसरा दिवस; प्रकृती ढासळली...
Sarkarnama June 10, 2025 04:45 PM
Bachchu Kadu Amravati : बच्चू कडू यांच्या अन्नत्यागाचा आज तिसरा दिवस; प्रकृती ढासळली...

अमरावतीचे माजी मंत्री बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून त्यांची प्रकृती ढासळली आहे. बच्चू कडू यांच्या आंदोलनाला भारतीय किसान युनियन, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्ष, माकप पक्षाचा पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, दिव्यांगाना 6 हजार रुपये प्रति महिना मानधन, यासह 17 मागण्यासाठी बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. बच्चू कडू यांची शुगर लेव्हल कमी झाली असून, या आंदोलनाची अद्याप सरकारकडून दखल घेतली गेलेली नाही.

NCP Foundation Day : राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे पुण्यात आज शक्तिप्रदर्शन Sharad Pawar, Ajit Pawar

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटाच्यावतीने पक्षाचा 26 वा वर्धापनदिनानिमित्ताने आज पुण्यात शक्तिप्रदर्शन होत आहे. अजित पवार गटाने बालेवाडी स्टेडियम इथं, तर शरद पवार गटाने बालगंधर्व रंगमंदिरात वर्धापनदिन सोहळा आयोजित केला आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटाकडून वर्धापनदिनाची जोरदार तयारी करण्यात आली आहे.

Chandrashekhar Bawankule : दस्त नोंदणी चुकल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार

‘‘राज्यात मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्रीच्या दस्ताची नोंदणी होत आहे. दस्त नोंदणीची तपासणी वरिष्ठ अधिकारी करीत असतात, तरीही अनेक तक्रारी का येतात, हा प्रश्न असून यापुढे नोंदणी चुकल्यास नोंदणी उपमहानिरीक्षक व सह जिल्हा निबंधक यांना जबाबदार धरले जाईल, तसे पत्र सर्व अधिकाऱ्यांसाठी काढण्यात यावे,’’ अशा सूचना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.

Pue Update : पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या काश्मिरी विद्यार्थिनीची बडतर्फी रद्द Pue Update

भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान सोशल मीडियावर विरोधी प्रतिक्रिया व्यक्त करून नंतर ती हटविणाऱ्या पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थिनीला उच्च न्यायालयाने दिलासा दिला. याचिकाकर्त्या 19 वर्षांच्या विद्यार्थिनीला बडतर्फ करण्याचा महाविद्यालयाचा निर्णय न्यायालयाने सोमवारी रद्द केला. परीक्षेला बसता यावे यासाठी विद्यार्थिनीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे निवेदन सादर केले आहे. तिच्या निवेदनावर तातडीने निर्णय घेण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.

Gadchiroli Update : एक लाख झाडे तोडण्यासाठी केंद्र सरकारची एका आठवड्यात मंजुरी

गडचिरोलीमधील बहुचर्चित सूरजागड लोह खाणीतील उत्खनन क्षमतेच्या वाढीला पर्यावरण विभागाने मंजुरी दिली. खाण परिसरातील 90 हेक्टर जंगलावरील तब्बल 1 लाख झाडे तोडण्यालाही वन्यजीन संरक्षणाच्या अटींसह परवानगी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, एक लाख झाडे तोडण्यासाठी केंद्र सरकारकडून एक आठवड्यात परवानगी देण्यात आली आहे.

Chhattisgarh Naxal Attack : नक्षली हल्ल्यात पोलिस अधिकारी शहीद; भूसुरुंगाचा स्फोट

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात अतिरीक्त पोलिस अधीक्षक आकाशराव गिरीपुंजे (वय 46) शहीद झाले. हल्ल्यात अन्य काही अधिकारी आणि पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. आकाशराव गिरीपुंजे हे मूळचे विदर्भातील रहिवाशी आहे. नक्षलवादी स्फोटके दोन फूट किंवा त्याहून अधिक खोल रस्त्याखाली लपवत आहेत.

Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाची अखेर स्थापना; 22 सदस्यीय प्राधिकरण गठीत Nashik Kumbh Mela

राज्य सरकारने नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विशेष प्राधिकरणाची स्थापना केली आहे. या प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची नियुक्ती करण्यात आली असून, उपाध्यक्षपदी जिल्हाधिकारी जलज शर्मा व नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांची नियुक्ती झाली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.