चालता-फिरता मृत्यूने गाठलं! चार पावलं टाकताच जमिनीवर कोसळला, २५ वर्षीय वकिलाचा हार्ट अटॅकने मृत्यू; घटना CCTVमध्ये कैद
esakal June 11, 2025 03:45 PM

Viral Video: हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू होण्याच्या अनेक घटना समोर येतायत. यातही तरुणांच्या मृत्यूचं प्रमाण वाढलं आहे. आता लखनऊतील एका २५ वर्षीय वकिलाचा चालता-चालता हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना घडलीय. त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात तरुण वकील उभा राहिला होता, अचानक अस्वस्थ वाटू लागल्यानंतर तो खाली कोसळल्याचं यात दिसतं.

लखनऊतील सरोजनी नगर तहसील कार्यालयात २५ वर्षीय वकिल अभिषेक उर्फ पवन सिंह याचा अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. अभिषेक सिंह त्याच्या सहकाऱ्यांसोबत कार्यालयाबाहेर उभा होता. त्यावेळी तो बाजूला जाण्यासाठी पावलं पुढे टाकतो आणि तिथंच खाली कोसळतो.

अभिषेक सोबत असलेल्यांना काही समजण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अभिषेक सिंह हा बंथरा इथल्या कानपूर रोडवर हनुमान मंदिराजवळ राहत होता.

लखनऊ तहसील कार्यालयात अभिषेक वकिली करत होता. नेहमीप्रमाणे सोमवारी तो तहसील कार्यालायत गेला. तिथं वकिलांसोबत तो चर्चा करत होता. त्याचवेळी अचानक त्याला हृदयविकाराचा झटका आला. यानंतर अभिषेकला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला होता.

अभिषेकच्या कुटुंबियांवर त्याच्या मृत्यूमुळे दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या कुटुंबियांनी म्हटलं की, अभिषेकला याआधी कसलाच त्रास नव्हता. हृदयविकाराची किंवा इतर कोणतीही मेडिकल हिस्ट्री नव्हती.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.